सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : शनिवारी रात्री माढा तालुक्यातील भीमानगर (टेंभुर्णी) पुलाशेजारी तांदळाचा ट्रक आणि मळीचा टॅंकर यांच्यात झालेल्या भीषण अपघातात ५ ठार तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मळीचा टॅंकर (एमएच १४ सीपी ४०२०) इंदापूरहून सोलापूरच्या दिशेने निघाला होता. तर तांदळाचा ट्रक ( एमएच २५ यु ४०४५) सोलापूरकडून येत होता. दोन्ही वाहने भीमानगर येथील एका पुलाजवळ सरदारजी ढाब्यासमोर आल्यानंतर तांदळाचा ट्रक डिव्हायडरला धडकून मळीच्या टॅंकरवर जोरात आदळला.
अपघात इतका भीषण होता की, ट्रक पलटी झाला. यामध्ये मळीच्या टॅंकरच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला, तर ट्रकच्या केबीनमध्ये बसलेले ५ जण जागीच ठार झाले. त्याचबरोबर ट्रकमध्ये असणारी लहान मुलं आणि स्त्रीया असे एकूण ३ जण जखमी झाले असून त्यांच्यावर इंदापूर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.






