पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : रस्त्याचे काम सुरु असेलल्या ठिकाणी जाऊन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाला फोन करून खंडणी मागितली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. ५) दुपारी पिंपळे गुरव येथे घडली.
याप्रकरणी शुभम संजय चिपडेपाटील (वय २१, रा. पुणे, मूळ रा. यवतमाळ) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून मोसिम बाबू सय्यद (वय २७, रा. दापोडी), डेव्हिड जगताप (वय ३५, रा.सांगवी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मोसिम याला अटक करण्यात आली आहे. .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी हे अंबिका कन्स्ट्रक्शन या कंपनीत नोकरी करतात. त्यांच्या कंपनीने पिंपळे गुरव येथील त्रिमूर्ती चौकातील रस्त्याचे काम घेतले आहे. ते काम सुरु असून फिर्यादी रविवारी कामावर होते. दुपारी चार वाजताच्या सुमारास आरोपी मोसिम आणि डेव्हिड दुचाकीवरून तिथे आले. आरोपींनी फिर्यादी यांना त्यांच्या मालकाला फोन करण्यास सांगितले.
फिर्यादी यांनी मालकाला फोन केला. त्यावेळी आरोपींनी ‘या ठिकाणी काम करायचे असेल तर मला दिवसाला दोन हजार रुपये द्यावे लागतील. नाहीतर मी लोकांना बोलावून काम बंद पाडील’ अशी धमकी दिली. फिर्यादी यांच्या मालकाला फोनवर धमकी देऊन शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी फिर्यादी यांना एटीएमकडे ओढू लागले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सांगवी पोलिसांनी मोसिम याला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.






