अहमदनगर (प्रतिनिधी) : हुंडयासाठी विवाहितेचा छळ आणि त्यांच्या मृत्यूच्या घटना नेहमीच वाचनात येत असतात परंतु मुलाचाही हुंड्यासाठी झळ झाल्याची घटना येथे समोर आली आहे. या छळाला कंटाळून मुलाने विषारी औषध प्राशन केले, त्यात त्याचा मृत्यू झाला आहे.
अहमदनगर शहरातील भवानीनगरमध्ये ही घटना घडली. धनेश चव्हाण असे मयत मुलाचे नाव आहे. दरम्यान याप्रकरणी चव्हाण कुटुंब कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले असता पोलिसांनी फिर्याद घेण्यास टाळाटाळ केली. न्याय मिळण्यासाठी चव्हाण कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथील भूजल सर्वेक्षणच्या मैदानात आमरण उपोषण सुरू केले आहे.
भवानीनगर येथील पारधी समाजातील धनेश चव्हाण व त्याची पत्नी पूजा चव्हाण यांचा ७ जानेवारी २०२१ रोजी विवाह झाला होता. पारधी समाजाच्या रुढी परंपरा नुसार मुलीकडच्यांना हुंडा द्यावा लागत असल्याने तीन लाख रूपये देणे ठरले होते. त्यापैकी ५० हजार रुपये दिले होते. उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरवले होते. परंतु मुलीकडच्यांनी आमच्या मुलास सारखा पैशाचा तगादा लावला व त्याचा छळ केला.
या जाचाला कंटाळून धनेश यांने विषारी औषध घेतल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेताना नाही. मुलीकडील लोक श्रीगोंदा तालुक्यातील मोरवाडी कोळगाव येथील असून त्यांची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करावा, अशी मागणी चव्हाण कुटुंबाने केली आहे.





