धुळे (प्रतिनिधी) : येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथे गावठी कट्टा विक्रीसाठी आलेल्या एकाला पकडले. त्यांच्याकडून दोन गावठी कट्टे, चार जिवंत काडतूस व एक मोबाईल असा ५७ हजारांचा मुद्येमाल जप्त केला आहे. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
शिरपुरातील वाडी खुर्द गावात सुखराम पवार नावाचा इसम अवैधरित्या पिस्टलची विक्री करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची गोपनिय माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईसाठी रवाना केले. पथकाने काल पावणे दहा वाजेच्या सुमारास गावात शोध घेवून अश्विनी बिअर बार समोरील रस्त्यावरून एकाला ताब्यात घेतले. त्याने त्याचे नाव सुखराम रेतम पवार (वय २३ रा.रायचुल, ता.पानसेमल जि.बडवाणी) असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता दोन गावठी कट्टे व चार जिवंत काडतूस मिळुन आले.
याप्रकरणी पोलिस शिपाई महेंद्र सपकाळ यांच्या फिर्यादीवरून एकाविरोधात शिरपुर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, सुखराम पवार याचेजवळून ५० हजार रूपये किंमतीचे दोन गावठी कट्टे, २ हजारांचे काडतुस व ५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल असा एकुण ५७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत, सपोनि प्रकाश पाटील, पोसई योगेश राऊत, बाळासाहेब सुर्यवंशी, पोहेकॉ श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाणे, संजय पाटील, संदीप सरग, योगेश चव्हाण, महेंद्र सपकाळ, मयुर पाटील, तुषार पारधी, कमलेश सुर्यवंशी, राहुल गिरी यांच्या पथकाने केली आहे.






