त्र्यंबकेश्वर येथे यजमान पळविल्याने पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी; ७ जण ताब्यात

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : त्र्यंबकेश्वर येथे पूजा विधी करण्यासाठी आलेले यजमान पळविल्याच्या कारणावरून पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पौरोहित्य करणाऱ्या पुजारी बांधवांच्या दोन गटांमध्ये वाद होऊन जोरदार हाणामारी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री हिरावाडी परिसरात घडली. पुजाऱ्यांच्या मोटारीची पोलसांनी झडती घेतली असता कारमधून एक गावठी कट्टा व अकरा जिवंत काडतुसे आढळून आली. याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी सात संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणप्रकरणी पोलिसांनी विरेंद्र हरिहरप्रसाद त्रिवेदी, आशिष विरेंद्र त्रिवेदी, मनिष विरेंद्र त्रिवेदी, सुनील आदित्य प्रसाद तिवारी, (सर्व रा. मोकळबाबानगर, हिरावाडी), आकाश नारायण त्रिपाठी, (केवडीबन), अनिकेत उमेश तिवारी (द्वारकेश हाइट, केवडीबन), सचिन नागेंद्र पांडे (तपोवन) आदींवर पोलीस शिपाई सागर पांढरे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी या संशयितांना अटक केली आहे. हे सर्व संशयित एकमेकांचे नातेवाईक असून त्यांचा त्र्यंबकेश्वर येथे पौरोहित्य करण्याचा व्यवसाय आहे, असे पोलिसांनी सांगितले. नागपूरचे एक यजमान धार्मिक विधी करण्यासाठी आले होते. त्यावेळी आपले यजमान पळविल्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता पुन्हा पौरोहित्य करणाऱ्या भावंडांच्या टोळीत बाचाबाची झाली आणि हाणामारी सुरू झाली. यावेळी पंचवटी पोलीस ठाण्याचे बिट मार्शल सागर पांढरे, सचिन अहिर असे गस्त घालत असताना त्यांना मारहाण प्रकार सुरू असल्याचे दिसून आले. त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

हाणामारी सुरूच असल्याने तात्काळ पोलीस ठाण्यात माहिती कळविली. त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, सहायक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी इर्टिगा (एमएच १५ जीएल ८४५२ ), दुसरी कार (एमएच १५ एचपी ४५०५) तपासणी केली असता इर्टिगा कारमध्ये एक गावठी कट्टा आणि ११ जिवंत काडतुसे तर दुसऱ्या कारमध्ये धारधार कोयत्यासारखे शस्त्र आढळून आले. पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here