मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : वरळी सिंलिंडर स्फोट प्रकरणावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल अपशब्द वापरणारे भाजपचे आमदार अॅड. आशीष शेलार यांच्यावर फौजदारी कारवाई करा अशी जोरदार मागणी शिवसेना महिला आघाडीकडून मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्याकडे करण्यात आली आहे.
शिवाय शेलार यांना अटक करून कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाइल उत्तर देण्याचा इशाराही शिवसेना महिला आघाडीकडून करण्यात आला आहे. वरळी बीडीडी चाळ नं. ३ मधील एका घरात ३० नोव्हेंबर रोजी गॅस लिकेज होऊन सिलिंडर स्फोट झाला. या दुर्घटनेत एकाच पुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले होते. यामध्ये दुसऱ्याच दिवशी चार महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला होता. तर बाळाचे वडील आनंद पुरी (२७) यांचा शनिवारी तर आई विद्या पुरी यांचा सोमवारी मृत्यू झाला. तर विष्णू पुरी (५) हा जखमी असून त्याच्यावर पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेनंतर नायर रुग्णालयात उपचार करण्यास दिरंगाई झाल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पालिकेने संबंधित दोन डॉक्टर्स आणि एका नर्सला निलंबित करण्यात आले आहे. शिवाय थर्ड पार्टी कमिटी नेमून चौकशीही सुरू आहे. विशेष म्हणजे दुर्घटनेनंतर सर्वात प्रथम शिवसेना दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी धावली होती. असे असताना भाजपकडून शिवसेना आणि महापौरांची नाहक बदनामी सुरू असल्याचा आरोप शिवसेनेकडून करण्यात आला आहे. दरम्यान, शेलार यांच्या वक्तव्याचा युवासेना युवतींच्या वतीनेही निषेध करून पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले आहे. यामध्ये सचिव दुर्गा शिंदे, सदस्या सुप्रदा फातर्फेकर, शीतल शेठ, सुभाशिनी थेवर, अश्विनी पवार, रेणुका विचारे यांच्या वतीने निवेदन देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.






