अवैध गौणखनिज वाहतूकदारांची मुजोरी; दोंडाईचात अप्पर तहसीलदारांना ठार मारण्याची धमकी

शिंदखेडा (प्रतिनिधी) : दोंडाईचा तालुक्यातील रुदाणे शिवारात गौण खनिज जेसीबीच्या साहाय्याने दोन ट्रॅक्टर विना परवाना खोदून वाहतूक करीत असताना दोंडाईचा अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी ताब्यात घेऊन शिंदखेडा पोलिस ठाण्यात कारवाईसाठी आणत असताना रस्त्यात त्यांना रस्त्यावर वाहन आडवे लावून अनधिकृतपणे जमाव जमवून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन त्यांच्या ताब्यातील दोन ट्रॅक्टर व एक जेसेबी मशीन यावरील चालक व मालकसह व इतर दहा ते बारा जणांनी पळवून नेली. याबाबत तक्रार स्वत: अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी शिंदखेडा पोलिसात दिली असून त्यावरून शिंदखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.


दोंडाईचा अप्पर तहसीलदार सुदाम महाजन यांनी शिंदखेडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि ७ डिसेंबर राजो दुपारी १२.४० वाजता त्यांना गुप्त माहिती मिळाली रुदाणे ता. शिंदखेडा येथे लामकनी रस्त्यालगत नाल्याजवळ जेसीबीच्या साहायाने मुरूम गौण खनिज कोरून ट्रॅकरच्या साहाय्याने लामकानी येथे वाहतूक सुरू आहे. याबाबत अप्पर तहसीलदारांनी तलाठी बादल जारवाल यांना त्या ठिकाणी जाऊन चौकशी करण्यास सांगितले. त्यानुसार तलाठी यांनी सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता त्यांनी अप्पर तहसीलदार यांना सदर ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने मुरूम खोदून दोन ट्रॅक्टरच्या साहाय्याने वाहतूक सुरू असून त्यांच्याकडे खोदकाम व गौण खनिज वाहतूकीचा कोणताच परवाना नाही.


त्यामुळे सर्व वाहने ताब्यात घेतली असून या ठिकाणी बेकायदेशीर जमाव जमा झाला आहे. माझ्या मदतीला तात्काळ यावे असे सांगीतले त्या नुसार अप्पर तहसीलदार सुदाम महाजन हे तात्काळ खाजगी वाहनाने पोहोचले. घटनास्थळी मुरुमने भरलेली ट्रॅक्टर व त्याला विना नंबरची लाल रंगाची ट्रॉली, दुसरे ट्रॅक्टर लाल रंगाचे विना नंबर व त्यावर प्रकाश मगन पाटील रा.लामकनी असे लिहिलेले व त्यात मुरुमने भरलेली लालरंगाची ट्रॉली व पिवळ्या रंगाचे जेसेबी आढळून आले.


त्यांच्याकडे कोणताच परवाना नसल्याने त्यांना अप्पर तहसीलदार यांनी शिंदखेडा पोलिसात घेऊन जात असताना रेवाडी गावाजवळील बुराई नदीच्या पुलाच्या अलीकडे काही व्यक्तींनी बोलेरो गाडी रस्त्यात उभी करून अप्पर तहसीलदार यांच्या गाडीसह सर्व वाहनाचा रस्ता अडविला व गाडीतून उतरून वाडी येथील गोविंदा नगराळे याने अप्पर तहसीलदार यांच्या जवळ येऊन त्यांना असभ्य भाषेत बोलून तुझा आज तमाश्याच उभा करतो अशी धमकी देऊन शासकीय कामात अडथळा निर्माण करून जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तुझ्यावर अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्या अंतर्गत केस दाखल करण्याची धमकी देऊन तेथील उभे असलेले वरील ट्रॅकरच्या चालकांना बेकायदा जमाव जमून ते परत नेण्याचे सांगितले.


हे सुरू असताना तेथून शेवाडे मंडळ अधिकारी परमेश्वर धनगर यांनी तलाठ्यांच्या मदतीने जेसेबी मशीन घटनास्थळावरून नेऊन सतारे शिवारात रस्त्याचे ठेकेदार एस. बी. देशमुख कंपनी यांच्या खडी क्रॅशर प्लांट वर नेऊन तेथील रखवालदार यांच्या ताब्यात देण्यात आले. तेथेही गोविंदा नगराळे व इतर दहा बारा साथीदार येऊन वाचमनच्या ताब्यातील जेसेबी मशीन पळवून नेले असे फिर्यादीत म्हटले असून शिंदखेडा पोलिसात ट्रॅक्टर मालक विजय पाटील (रा लामकनी), ट्रॅक्टर चालक शंकर पांडू भिल (रा रुदाणे), ट्रॅक्टर चालक नाना हिलाल पवार (रा रुदाणे), ट्रॅक्टर मालक प्रकाश मगन पाटील (रा लामकनी), जेसीबी मशीन चालक लक्ष्मण ओराम, व गोविदा नगराळे (रा वाडी), इतर १० ते १२ अनोळखी व्यक्तींवर भादंवि ३५३, ३४१, ५०६, १४३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here