नाशिक (विशेष प्रतिनिधी) : नाशिक-मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटातील दुसऱ्या वळणावर पहाटे ४ वाजेच्या सुमारास पिकअप व मालवाहू ट्रकची जोरदार धडक झाली.
याबाबत अधिक माहिती अशी की, मुंबईच्या दिशेने जात असताना पिकअप (क्रमांक एमएच १५ एफव्ही ६१६८) ला मालवाहू ट्रक (क्रमांक एमएच १५ सीके १८४४) ने जोरदार धडक दिली. या अपघातात पिकअपने दोन पलटया खाल्ल्याने पिकअप रस्त्याच्या कडेला फेकली गेली तर ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक परत पिकअपवर जाऊन आदळली.
या घटनेत पिकअप चालक जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी कसारा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, सकाळी कसारा घाटात मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. साधारण अर्धा ते एक तास ही वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या २ ते ३ किलोमीरपर्यंत रांगा लागल्या होत्या.






