नाशिक पोलिसांनी लावला दोन घरफोड्यांचा छडा

नाशिक (विशेष प्रतिनिधी) : अंबड पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडे चौकशी केली असता दोन विविध ठिकाणी त्यांनी घरफोडी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ८४ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत केले आहेत.


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपोनि गणेश शिंदे, पोलीस नाईक प्रमोद काशीद यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दत्त चौक, मटन मार्केट व तोरणानगर या ठिकाणाहून विकास पांडुरंग झाडे (वय २१, रा. व्ही. एन. नाईक शाळेसमोर, दत्तचौक, नवीन नाशिक) तात्याराव बाबुराव झाडे (वय ३२) या दोन संशयितांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता त्यांनी दोन ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून १ लाख ८४ हजार ५०० रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागिने हस्तगत करून अंबड पोलीस ठाण्यातील दोन दाखल गुन्ह्यांची उकल केली.


ही मोहीम वपोनि भगीरथ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर, पोलीस नाईक चंद्रकांत गवळी, किरण गायकवाड, अनिरुद्ध येवले, मच्छिंद्र वाघचौरे, तुळशीराम जाधव, योगेश शिरसाठ, मुकेश गांगुर्डे, हेमंत आहेर, राकेश राउत, जनार्धन ढाकणे, नितीन सानप यांनी राबविली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here