पुणे (जिल्हा संपादक सुरज घम) : घरात काम करणाऱ्या मोलकरीणीने घराच्या मालकिणीला आणि त्यांच्या दोन मुलांना गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर तिच्या पतीच्या मदतीने घरातील कपाटातील लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम लंपास केल्याची घटना बावधन येथील गोल्डन आर्च सोसायटीमध्ये मंगळवारी (दि.७) रात्री सव्वाबाराच्या सुमारास घडली.
याप्रकरणी हितेश सुभाषचंद्र धिंग्रा (वय-४६ रा. रो हाऊस 2 बी, गोल्डन आर्च सोसायटी, बावधन) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.त्यावरून किशोर व त्याची पत्नी पुजा (दोघे रा. नेपाळ) यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हितेश धिंग्रा यांची बहीण श्रुती रवी खोसला यांच्या घरात आरोपी किशोर आणि त्याची पत्नी पूजा दोघेजण घरकाम करत होते.
आरोपींनी श्रुती आणि त्यांच्या दोन मुलांना गुंगीकारक औषध दिले. त्यामुळे ते तिघे बेशुद्ध झाले. त्यानंतर आरोपींनी घरातील लोखंडी लॉकर तोडून तसेच लाकडी कापाटे उघडून दीड लाख रुपये रोख रक्कम, सोन्याचे दागिने चोरून नेले. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप बोरकर करीत आहेत.







