गावकऱ्यांनी ओलीस ठेवलेल्या ६९ ऊस कामगारांची कोल्हापूरातून सुटका

69-sugarcane-workers-held-hostage-by-villagers-released-from-Kolhapur

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : मध्य प्रदेशातील गुना जिल्ह्यातून कोल्हापूरात आलेल्या कामगारांना गावकऱ्यांनी ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या ओलीस ठेवलेल्या कामगारांना गावकऱ्यांनी ना पगार दिला, ना त्यांना व्यवस्थित जेवण दिलं गेलं.गुना पोलिसांनी ६९ मजुरांची सुटका केली असून, यामध्ये १५ पेक्षा जास्त मुलांचा समावेश आहे. हे सर्व कामगार सहारिया आदिवासी समजातील असून शिवपुरी येथील एका व्यक्तीनं त्यांना काम मिळवून देण्याच्या नावाखाली महाराष्ट्रात आणले होते.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ नोव्हेंबर रोजी सहारिया समाजातील सुमारे ६९ महिला, पुरुष आणि मुले, जिल्ह्यातील धरणवाडा आणि कँट भागातील आदिवासी महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात मजुरीच्या शोधात आले होते. तेथे कामाच्या शोधात सर्व लोक कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील गावातील नदीकाठावर पोहोचले. तिथल्या लोकांनी त्यांच्या असाह्यतेचा फायदा घेत सर्वांना ऊसाच्या शेतात काम करायला लावले. त्या बदल्यात केवळ जेवण देण्यात आले. या कामगारांना वेतनापोटी पैसे न देता त्यांना अमानुष वागणूक दिली जात होती. विरोध केल्यावर गावकऱ्यांनी त्यांना ओलीस ठेवले आणि त्यांचे ये-जाण, फिरणं बंद केलं होतं.
दरम्यान या कामगारांनी गुनामधील त्यांच्या नातेवाईकांना गुप्तपणे घटनेची माहिती दिली. संबंधितांनी घटनेची माहिती पोलीस अधीक्षकांना दिली. त्यानंतर पोलीस अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. जिल्हाधिकारी फ्रँक नोबल ए यांनी कामगारांना घरी परतण्यासाठी गाडी उपलब्ध केली. गाडी उपलब्ध झाल्यानंतर जिल्ह्यातील पोलिसांचे पथक कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले. या पथकाकडून जिल्ह्यात कामगारांचा शोध घेण्यात येत होता. तपासादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील नदीकाठच्या गावात त्यांना ओलीस ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली.


पोलिसांच्या पथकाने गावात जाऊन पाहिले असता जिल्ह्यातून कामाच्या शोधात आलेले महिला, पुरुष आणि लहान मुले असे एकूण ६९ जण अत्यंत दयनीय अवस्थेत ऊसाच्या शेतात काम करत होते. पोलिसांनी मजुरांची गावकऱ्यांच्या तावडीतून सुखरुप सुटका करुन त्यांना पुन्हा गुना येथे नेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here