इंदौर (मध्यप्रदेश) : येथील एका बँक कर्मचाऱ्याने आणि त्याच्या पत्नीने विष प्राशन केलं. मंगळवारी संध्याकाळच्या दरम्यान रुग्णालयात नेत असताना पतीचा मृत्यू झाला, तर बुधवारी सकाळी पत्नीचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या रुममध्ये चिठ्ठी आढळुन आली. यामध्ये आयुष्याला कंटाळून आत्महत्या केल्याचं नमूद केलं आहे.
याबाबत माहिती अशी, मोनू गुप्ता आणि अंजली असं पती पत्नीचे नाव आहे. अंजली ही मूळची बेटमाची, तर मोनू मुसाखेडी परिसरातील रहिवासी होता. एप्रिलमध्ये लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच दोघेही मुसाखेडी येथून लसुडिया परिसरात राहू लागले. त्या दोघांनी मंगळवारी संध्याकाळी विष प्राशन केले. यानंतर वेदनेने तडफडत ते फ्लॅटच्या बाहेर आले. शेजाऱ्यांनी १०० क्रमांकावर तक्रार केली होती.
दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे मोनूला डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर अंजलीला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. परंतु, तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघांचं याच वर्षी विवाह झाला होता. मोनू हा कोटक महिंद्रा बँकेत कामाला होता. त्याच्या घरात बँकेचे कार्डही आढळून आले आहे. दरम्यान, पोलिस उपनिरिक्षक गौरव तिवारी आणि एफआरव्ही कॉन्स्टेबल गौतम पाल घटनास्थळी पोहोचले होते. तेव्हा त्या दांम्पत्याच्या रुममध्ये एक चिठ्ठी सापडली.
या चिठ्ठीमध्ये म्हटलं आहे की, आयुष्यात खूप अडचणी आहेत. आता जगायची इच्छा नाही, स्वेच्छेने जीव देत आहोत. गावातच अंत्यसंस्कार करावेत. तसेच, सुसाईड नोटमध्ये अंजलीने लिहिलं की तिला नववधूप्रमाणे सजवावं आणि नवरीच्याच वेशभूषेत तिच्यावर अंत्यसंस्कार करावेत. दरम्यान, या आत्महत्येमागे कर्जबाजारीपणा असल्याचं सांगण्यात येत आहे. तर, पोलिसांनी दोघांचा मोबाईल आणि सुसाईड नोट जप्त केली आहे. या घटनेबाबत पोलिस तपास करीत आहेत.







