ऑनलाईन पैसे दिल्याचे बनावट स्क्रीनशॉट पाठवून फसवणाऱ्यास अटक

fruad

ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : एका औषध विक्रेत्यास ऑनलाईन महागड्या इंजेक्शनची ऑर्डर देऊन त्याचे पेटीएमद्वारे पैसे भरल्याचे बनावट स्क्रीन शॉट पाठवून फसवणूक करणाऱ्या तरुणास पोलिसांनी अटक केली आहे.

दहिसर येथे राहणाऱ्या संदीप शिंदे औषधे विक्रीचा व्यवसाय असून ऑनलाईन संकेतस्थळ वरून सुद्धा ग्राहकांच्या मागणी प्रमाणे औषधं पुरवण्याचे काम करतात. २७ ऑक्टोबर रोजी नितेश सिंग (वय २४, रा. शांती अकॉर्ड, गोकुळ व्हिलेज, शांती पार्क) ह्याने ऑनलाइन १७ हजार ३७० रुपयांची औषधे मागवली. नितेशने औषधे स्वीकारण्यासाठी मीरारोड रेल्वे स्थानक बाहेर असलेल्या औषधाच्या दुकाना जवळ कर्मचारी पाठवण्यास सांगितले.

सायंकाळी शिंदे यांच्या कर्मचाऱ्याने त्या ठिकाणी जाऊन नितेश कडे ती औषधे दिली. त्यावेळी नितेशने ऑनलाईन पैसे अदा केल्याचे दोन स्क्रीनशॉट शिंदेंना पाठवले. पैसे दिल्याचे समजून कर्मचाऱ्याने औषधे नितेश याला दिली परंतु दुसऱ्या दिवशी शिंदे यांनी बँक खात्याची पडताळणी केली असता नितेश ने सांगितलेली रक्कम जमाच झाली नव्हती. शिंदे यांनी नितेशला पैसे मिळाले नसल्याचे वारंवार मेसेज केले. मात्र त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे शिंदे यांनी सायबर गुन्हे शाखेस तक्रार केली होती.

गुन्हे शाखेचे उपायुक्त डॉ महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, उपनिरीक्षक प्रसाद शेनोलकर व संतोष भिसे सह इलग, निकम, पवार, माळी यांच्या पथकाने तपास करून नितेश सिंग याला शोधून काढले. १५ डिसेंबर रोजी नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपीला अटक करण्यात आली.अश्या प्रकारे ऑनलाईन व्यवहारात फसवणूक झालेल्यांनी सायबर शाखा वा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करावी. ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगून खात्री करून घ्यावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here