ठाणे (सहसंपादक लक्ष्मीनारायण वन्नम) | बस प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या चोरणाऱ्या एका सराईत टोळीचा ठाणे गुन्हे शाखा, घटक-१ च्या पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन महिलांसह एका पुरुषाला अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल २० लाख ५३ हजार रुपये किमतीच्या १३० ग्रॅम वजनाच्या ६ सोन्याच्या बांगड्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे ठाणे शहर परिसरातील ६ गुन्हे उघडकीस आले आहेत.
ठाण्यातील लुईसवाडी बस स्टॉप येथे बसमध्ये चढताना एका वृद्ध महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक-१ चे पथक करत होते. पोलीस हवालदार संदिप महाडिक व पोलीस शिपाई अमोल ढावरे यांनी घटनास्थळासह परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करून आरोपींची ओळख पटवली.
मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी अंबरनाथ पश्चिम येथील सुभाष वाडी, वांद्रा पाडा परिसरातून कपिल सुरेश तीडंगे (वय ३८) आणि पोर्णिमा सुरेश तीडंगे उर्फ कल्लु कल्पना (वय ३२) यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर या गुन्ह्यातील तिसरा साथीदार दिपक वतन अभंगे (वय ४८) यालाही सापळा रचून अटक करण्यात आली.
आरोपींकडे केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी नौपाडा, ठाणेनगर आणि राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अशाच प्रकारे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून २० लाख ५३ हजार रुपयांच्या ६ सोन्याच्या बांगड्या हस्तगत केल्या. या आरोपींकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शिरसाठ पुढील तपास करत आहेत.
ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अमरसिंग जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक अमोल वाळझाडे व गुन्हे शाखा घटक-१ च्या पथकाने केली.







