ठाणे (प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) : नौपाडा येथील मल्हार सिनेमाजवळील पार्वती निवास येथील दुमजली इमारतीला दोन दिवसांपूर्वी (२० डिसेंबर) आग लागली होती. या आगीत बेघर झालेल्या दोन कुटुंबाना आज महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते महापालिकेच्या रेंटल स्कीममधील घरांच्या चाव्या देण्यात आल्या. महापौरांच्या पाठपुराव्यामुळे या बेघर कुटुंबाना अवघ्या दोन दिवसात घरे मिळाल्याने टकले कुटुंबियांना दिलासा मिळाला असून त्यांनी महापौरांची भेट घेवून आभार व्यक्त केले.
नौपाडा येथील पार्वती निवास या इमारतीला रविवारी आग लागली, या आगीत या इमारतीतील कुंदन रघुनाथ टकले व रविंद्र रमेश टकले या रहिवाशांची घरे पूर्णपणे जळून खाक झाली. ही बातमी समजताच नौपाडा येथील शिवसेनेचे उपविभागप्रमुख किरण नाकती यांनी तात्काळ महापौर नरेश म्हस्के यांच्याशी संपर्क साधला. महापौरांनीही तातडीने या कुटुंबाशी फोनवरुन चर्चा करुन आम्ही पाठीशी आहोत, काळजी करु नका असा शब्द दिल्याने टकले कुटुंबियांना धीर मिळाला. महापौर नरेश म्हस्के यांनी देखील महापालिकेच्या रेंटल हौसिंग स्कीममधील घरे या टकले कुटुंबियांना भाडेतत्वावर देण्याबाबत संबंधित विभागाला आदेश दिले. त्यानुसार आज पार्वती इमारतीतील टकले कुटुंबियांना महापौर दालनात महापौर नरेश म्हस्के यांनी या दोन्ही कुटुंबियांना चाव्याचे वाटप केले.
आगीत पूर्णपणे उध्वस्त झालेल्या टकले कुटुंबियांना दोन दिवसात घरे मिळाल्याने या कुटुंबियांना दिलासा मिळाला आहे. या कुटुंबियांनी महापौर नरेश म्हस्के, ठाणे महापालिका प्रशासन व किरण नाकती यांचे आभार व्यक्त केले आहे.






