पुणे (उपसंपादक वासंती देवळे) : शिरुर तालुक्यातील जांबूत येथील शेतकरी कुटुंबातील अरविंद, कोमल व सागर थोरात या भावंडांची महाराष्ट्र पोलिस दलात नुकतीच निवड झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल जांबूत ग्रामस्थांनी त्यांचा सन्मान केला आहे.
दिलीप राघु थोरात हे मुळचे माळेगाव (ता. पाथर्डी ) येथील रहिवाशी. गेल्या ३० वर्षांपूर्वी ते शेतमजुरी करण्यासाठी जांबूत येथे आले होते. जांबूत येथे आल्यानंतर त्यांना अरविंद, कोमल व सागर अशी तीन अपत्ये झाली. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती नाजूक असतानाही मुलांची शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मुंबई येथे झालेल्या सन २०१९ च्या महाराष्ट्र पोलिस भरतीत तीनही भावंडांची एकाच वेळी निवड झाली. अरविंद थोरात व सागर थोरात यांची मुंबई शहर पोलिस तर कोमल थोरात यांची पुणे रेल्वे पोलिस येथे नियुक्ती झाली आहे. त्यांच्या पोलिस दलात झालेल्या नियुक्तीबद्दल परिसरात आनंदाचे वातावरण असून, त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पोलिस दलात नियुक्ती झाल्याबद्दल जय मल्हार हायस्कुल व जांबुत ग्रामस्थ यांच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयाचे ध्वजारोहण या तीन भावंडांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.







