प्रेमविवाह करणाऱ्या तरुणावर सासरच्यांचा प्राणघातक हल्ला

yogesh-lavate-sangli-miraj

सांगली (प्रतिनिधी दिनेश लोंढे) : जिल्ह्यात ‘सैराट’ चित्रपटासारखी भयानक आणि काळजाला थरकाप करणारी घटना घडली आहे. सांगली जिल्हयातील मिरज येथे प्रेमविवाह केला म्हणून एका तरुणावर त्याच्या सासरच्यांनी प्राणघातक हल्ला केला आहे. या हल्ल्यात योगेश लवाटे हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, योगेशने दीड महिन्यांपूर्वी वाळवा तालुक्यातील भडकंबे येथील तरुणीसोबत प्रेमविवाह केला होता. पण तिच्या कुटुंबियांचा लग्नाला विरोध होता. त्यामुळे त्यांनी कुटुंबियांना न सांगता प्रेम विवाह उरकला. पण या प्रेमविवाहाचा मुलीच्या कुटुबियांच्या मनात राग होता. त्यांना मुलीपेक्षा प्रतिष्ठा जास्त महत्त्वाची वाटत होती. समाजात आपली अवहेलना झाली या भावनेतून त्यांना बदला घ्यायचा होता.

या दरम्यान दोन दिवसांपूर्वी योगेश लवाटे आणि मुलीचे आई-वडील यांच्यामध्ये मोठा वाद झाला होता. हा वाद थेट मिरज शहर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला होता. संबंधित घटनेनंतर योगेश हा गुरुवारी (३ फेब्रुवारी) रोजी रात्रीच्या सुमारास घरी निघाला असता दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात योगेश गंभीर जखमी झाला आहे. यानंतर त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले गेले. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहे. या घटनेमुळे त्याचे कुटुंबीय खचले आहे.

दरम्यान, या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरु केला असून, याप्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघा आरोपींची सध्या चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here