वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारीच निघाला गांजा तस्कर; ओडिसा पोलिसांच्या सहा जण ताब्यात

mumbai-police-arrested-in-odisha-in-charge-smuggling

ठाणे (महाराष्ट्र राज्य उपसंपादक ॲड. मनोज पाटील) : मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस कर्मचारी साजिद फारूक पठाण (वय ३२ मूळ रा. नांदेड) हा गांजा या अंमली पदार्थांचा तस्कर निघाला आहे. छत्तीसगढ पोलिसांनी ओडिसा सीमेवर पठाणसह वसई – नालासोपारा भागातील ६ जणांना अटक करून १५० किलो गांजा जप्त केला आहे .



ओडिसामधून मोठ्या प्रमाणात मुंबई , ठाणे , पालघर सह अनेक भागात गांजा या अंमली पदार्थांची तस्करी छत्तीसगढमार्गे केली जाते . बस्तर जिल्ह्यातील नगरनार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुधराम नाग ह्यांना माहिती मिळाली की, ओडिसामधून गांजा घेऊन मुंबईच्या दिशेने काही तस्कर जाणार आहेत. या माहितीच्या आधारे त्यांनी सीमेवर धनपुंजी फॉरेस्ट नाका येथे ४ फेब्रुवारी रोजी पोलीस पथकाने संशयित इनोव्हा गाडी अडवली. या गाडीच्या तपासणीत १६ गोणीत भरून असलेला गांजाचा साठा सापडला होता. ओडिसामधून आणलेला गांजा पालघर जिल्ह्यातील नालासोपारा भागात नेला जात होता.

गांजा तस्करी करणारा साजिद पठाण हा पोलीस असल्याचे समजल्यावर ओडिसा पोलिससुद्धा अवाक झाले. साजिद सोबत असलेले अन्य गांजा तस्कर अजय अंगद पटेल (वय २२) रा . कुणाल नगर, गावराई पाडा, वालिव; सूरज रमेश मौर्य (वय २२) रा . गावराई पाडा , वालीव व रितेश राजेश सिंह (वय २२) रा . बिलालपाडा , नालासोपारा सर्व वसई तालुका , जिल्हा पालघर यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या कडून ४ लाखांचा गांजा, ८ लाखांची गाडी, मोबाईल आदी मुद्देमाल जप्त केला आहे. हे सर्व आरोपी न्यायालयीन कोठडीत असून ओडिसा येथून ज्याच्या माध्यमातून गांजा घेतला होता त्या आरोपीसह मुख्य सूत्रधाराचा तेथील पोलीस शोध घेत आहेत .

ह्या घटनेने मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस दलात खळबळ उडाली असून साजिद हा मुख्यालयातील कर्मचारी असला तरी खानिवडा येथे चेकपोस्टवर तैनात होता. त्याच्यावर कारवाई केली जाणार असून एका पोलीस अधिकाऱ्यास नगरनार पोलीस ठाण्यात गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी रवाना केले गेले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here