कळमुनरीत सराफा दुकानाचे शटर उचकटून दोन लाखांचे दागिने लंपास

hingoli-theft

हिंगोली (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील आखाडाबाळापूर येथील मदिना ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी २ लाख रुपये किंमतीचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले. ही घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. या प्रकरणी बाळापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बाळापूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याजवळ शेख इरफान यांचे मदिना ज्वेलर्स नावाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. रविवारी रात्री १२ वाजता शेख इरफान दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास शेख यांना दुकानात चोरी झाल्याची माहिती मिळाली. यानंतर शेख यांनी लगेच बाळापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली. आणि दुकानाकडे धाव घेतली. यावेळी दुकानाचे शटर उघडलेले व कुलूप तोडलेले त्यांच्या लक्षात आले.


शेख इरफान हे रात्री बारावाजेपर्यंत दुकानात काम करत बसले होते. तर पहाटे चार वाजता ही घटना त्यांच्या लक्षात आली. अवघ्या ४ तासात चोरट्यांनी दुकानावर डल्ला मारत २ लाख रुपये किमतीचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले आहेत. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, उपनिरीक्षक बालाजी पुंड, जमादार नागोराव बाभळे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत संशयिताचा शोध सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here