किरकोळ भांडणाला मोठे स्वरुप देत मागासवर्गीय तरुणावर मोठा गुन्हा दाखल करण्यास पोलिसांना केले प्रवृत्त
सातारा (उपसंपादक प्रशांत भिसे) : जावळी तालुक्यातील सरताळे गावाच्या ग्रामसभेत किरकोळ कारणावरुन गैरसमजातून वाद झाला होता. मात्र गाव पातळीवर असलेल्या या छोट्याशा भांडणाचा विपर्यास करत साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बेकायदा जमाव जमवत पोलीस ठाण्याबाहेर तीन तास ठिय्या आंदोलन करत मागासवर्गीय तरुण सचिन तुकाराम भिसे याच्यावर पोलीसांवर गुन्हा दाखल करण्यासाठी राजकीय दबाव टाकला.
याबाबत समजलेल्या माहितीनुसार सचिन तुकाराम भिसे यांनी सरताळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत बिअर बार मंजुरीचा ठराव मिळवला होता. याला विरोध करण्यावरुन त्यांचे ग्रामपंचायतीचे शिपाई उमेश बळवंत पवार यांच्याशी वाद झाला होता. उमेश पवार यांनी फायदा घेत या किरकोळ वादाला मोठे स्वरुप देत आपले सचिन भिसे यांनी जबरदस्तीने गाडीत बसवत अपहरण करुन, आपणांस मारहाण केली व त्याच्या गळ्यातील एक तोळ्याची सोन्याची चेन, चांदीचे ब्रेसलेट जबरदस्तीने हिसकावून रोख रक्कम लुटली असल्याची फिर्याद मेढा पोलीस ठाण्यात दाखल केली.
गावपातळीवर असलेल्या या वादातून राजकीय फायदा घेण्याच्या हेतूने आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी तात्काळ पोलीस स्टेशनला भेट देत उमेश पवार याच्यासोबत असलेल्या लोकांसोबतच २५ ते ३० महिलांसह नागरिकांचा बेकायदा जमाव जमवून ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. मध्यरात्रीपर्यंत चाललेल्या या ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून पोलीसावर राजकीय दबाव आणत मागासवर्गीय तरुण सचिन तुकाराम भिसे याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना प्रवृत्त केले. तसेच या प्रकरणी सचिन तुकाराम भिसे यांच्याकडून वा त्यांच्या मागासवर्गीय समाजाकडून आलेल्या कोणत्याही तक्रारीची दखल न घेण्यासाठी पोलिसांना धमकीवजा सूचनादेखील त्यांनी केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या या वागणुकीतून मागासवर्गीय समाजाविषयी त्यांच्या मनात असलेला आकस तसेच गावपातळीवरील राजकारणात द्वेष पसरवण्याचे कारस्थान दिसून येते.
आमदारांच्या राजकीय दबावातून पोलिसांनी या प्रकरणी निर्दोष असणाऱ्या मागासवर्गीय तरुण सचिन भिसे यांच्यावर मेढा पोलीस ठाण्यामध्ये ३९२, ३६५, ३५३, ३२३, ५०४, ५०६ जबरी चोरी, अपहरण असे गुन्हे दाखल केले आहेत. केवळ मागासवर्गीय तरुणावर गुन्हा दाखल करण्याचा अट्टाहास करत किरकोळ वादाला मोठे स्वरुप देत आपली राजकीय पोळी भाजून घेण्याच्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या या प्रवृत्तीचा समाजातील विविध स्तरातून निषेध होत आहे.







