नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : नेरुळ येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. स्वत:च्या अल्पवयीन मुलीवर बापानेच अत्याचार केल्याची घटना इथे घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी नेरुळ पोलीस ठाण्यात बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा नराधम एका व्यावसायिकाच्या घरी स्वयंपाकी म्हणून काम करायचा. तेथेच त्याने आपल्या १५ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केले.
हा नराधम स्वयंपाकी (वय ४२) झारखंड राज्यातील रहिवासी आहे. मात्र, ज्याठिकाणी तो काम करायचा तो तेथेच राहायचा. त्याने आपल्या १५ वर्षीय मुलीला आपल्या सोबत नेरुळ येथे आणले. यानंतर नेरुळ येथे राहणाऱ्या व्यावसायिकाच्या घरातच त्याने आपल्या मुलीसोबत हे धक्कादायक कृत्य केले. मंगळवारी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. यानंतर पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार आपल्या मालकिणीला सांगितला.
घटनेची माहिती मालकिणीला मिळताच त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर नेरुळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर संबंधित माहिती मिळताच नराधम बाप फरार झाला आहे. नेरुळ पोलीस त्याचा शोध घेत असून याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.