महिला लिपिकाने बँकेला लावला ९८ लाखांचा चुना

नागपूर (उपसंपादक उमेश अबनूलकर) : येथे एका लिपिकेनेच बँकेला तब्बल ९८ लाखांचा चुना लावला आहे. नागपुरातील एका को ऑपरेटिव्ह बँकेत ही प्रकार घडला. या महिलेने बँकेचा आयडी आणि पासवर्डचा वापर केला. यानंतर आपल्या पतीच्या खात्यात रक्कम वळवली. याप्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मनीषनगर येथील निवासी स्नेहा तुषार नाईक (वय ३५) ही महिला देवनगर येथील यवतमाळ को-ऑपरेटिव्ह बँकेत लिपिक म्हणून कार्यरत आहे. बँकेच्या गोपनीय दस्तावेजांची माहिती तिच्याकडे होती. इतकंच नव्हे तर बँकेच्या एकूण उलाढालीचा डाटाही तिच्याकडे होता.


आरोपी महिला स्नेहा नाईक हिने तिचा पती तुषार नाईक आणि लहान मुलाच्या नावे बँकेत खाते उघडले होते. तसेच तिने त्याची माहिती कोणत्याही अधिकाऱ्याला दिली नाही. इतकेच नव्हे तर व्यवस्थापकांची परवानगी सुद्धा घेतली नाही. त्यानंतर स्नेहा या महिला लिपिकेने मागील काही महिन्यात ९७ लाख ६३ हजार ३१३ रुपये पतीच्या खात्यात वळते केले. यानंतर बँकेच्या जमा-खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने चौकशी करण्यात आली. त्यानंतर स्नेहा हिने बँकेला चुना लावल्याचे समोर आले.

याप्रकरणी बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी बँकेचे अकाऊंट स्टेटमेंट मागवले आहे. या लिपिक महिलेचा पतीसुद्धा एका बँकेत काम करतो. पतीला दुसऱ्या ठिकाणाहून पैसे आले आहेत, असा दावा या महिलेने केला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार २०१६ पासून सुरू होता. मात्र, सहा वर्षाच्या या कालावधीत बँकेचे ऑडिट जेव्हा केले गेले, तेव्हा हा प्रकार कसा लक्षात आला नाही, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here