तांबापुरा दंगलीतील मुख्य संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी केले जेरबंद

sameer-kakar

जळगाव (प्रतिनिधी शाहिद खान) : शहरातील तांबापुरा परिसरातील बिसमिल्ला चौकात दंगल झाल्याची घटना घडली होती. या दंगलीतील मुख्य संशयित समीर हनिफ काकर (वय-१९, रा. तांबापुरा बिस्मिल्ला चौक) याला एमआयडीसी पोलिसांनी शिंदखेडा येथे जेरबंद केले.

संशयित समीर हा गुजरात येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती एमायडिसी पोलीस स्टेशनचे पोना इम्रान सय्यद यांना मिळाली. त्यानुसार इम्रान सय्यद यांनी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे कर्मचारी गोविंदा पाटील यांना सोबत घेत शुक्रवारी संशयित समीर काकर यांच्या धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथून मुसक्या आवळल्या.

शहरातील तंबापुरा परिसरातील बिस्मिल्ला चौकात मंगळवार दि. १७ रोजी रात्री दोन तरुणांमध्ये वाद होवून दोघांकडून जमलेल्या जमावाने एकमेकांवर तुफान दगडफेक केल्याची घटना घडली होती. या दगडफेकीत महिलेसह पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.

याप्रकरणी जखमी पोलीस कर्मचारी यांच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलिसात समीर काकर, सैय्यद सलमान, कल्पेश सोनार, गोविंदा गायकवाड, भिला हटकर, विठ्ठल हटकर, इमरान तडवी, शाहरुख खाटीक, सलमान मोहम्मद कासीम, रिजवान उर्फ काल्या गयासोद्दीन शेख यांच्यासह ३० ते ४० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात होता. गुन्हा घडल्यापासून मुख्य संशयित समीर काकर हा फरार होता. त्यानेच तांबापुरातील दंगल घडवून आणल्याची माहिती ही पोलिसांच्या तपासात समोर आली होती.

यापूर्वी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी या १२ संशयितांना अटक केली होती. या संशयितांना जिल्हा न्यायालयाने दि. २३ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here