हडपसर-मुंढवा रोडवर तरूणाचा खून

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : हडपसर-मुंढवा रस्त्याने जाताना पाठीमागून आलेल्या दुचाकीचा धक्का लागला. यावर वाद झाल्याने झालेल्या भांडणात दोघा तरुणांनी केलेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाला.

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी दोघा तरुणांवर खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. अशोक शंकर राव (वय ३०, रा. भोईराज सोसायटी, राजश्री शाहु शाळेमागे, मुंढवा) असे मृत्यु पावलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सागर शंकर राव (वय २०, रा. मुंढवा) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना मुंढवा येथील हडपसर मुंढवा साई फर्निचर दुकानासमोर मंगळवारी सायंकाळी पावणेसात वाजता घडली.

अशोक राव हा फिर्यादी यांचा मोठा भाऊ आहे. तो मिळेल तेथे बिगारी काम करतो. अशोक हा काम शोधण्यासाठी मंगळवारी सकाळी दहा वाजता घरातून गेला होता. सायंकाळी घरी येत असताना साई फर्निचर येथे आला असताना पाठीमागून येणार्‍या दुचाकीचा त्याला धक्का लागला. तेव्हा अशोक याने बडबड केली. तेव्हा दुचाकीवरील दोघा तरुणांनी खाली उतरुन अशोक याला बेदम मारहाण केली. त्यात तो रस्त्यावर पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागला. त्यातच त्याचा मृत्यु झाला. त्यानंतर दुचाकीवरील दोघेही जण पळून गेले.

या घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई आणि मुंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनेच्या जवळच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यावर दोघांच्या मारहाणीमुळेच अशोक राव याचा मृत्यु झाल्याचे आढळून आल्याने पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. मुंढवा पोलीस पसार झालेल्या दुचाकीस्वारांचा शोध घेत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here