मुंबई (क्राइम रिपोर्टर प्रितेश मांजरेकर) : विरार येथे मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एका बारबालेने बनावट बंदुकीच्या आधारावर एक ज्वेलर्स दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र ज्वेलर्स मालकाच्या प्रसंगावधामुळे या महिलेचा डाव फसला आणि या सराफाने त्या महिलेला पोलिसांच्या ताब्यात दिले.
विरार पश्चिमेच्या ग्लोबल सिटी या ठिकाणी देवनारायण हे ज्वेलर्सचे दुकान आहे. त्या दुकानात मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक बुरखाधारी महिला या दुकानात खरेदीसाठी आली होती. त्यावेळी देवलाल गुजर हे दुकानात एकटे होते. दोन तास ती महिला लग्नासाठी दागिने बघत होती. यानंतर अचानक तिने लपवून आणलेली बंदूक काढली आणि देवलाल गुजर याला धमकावत दागिने आणि रोख रक्कम देण्याची मागणी केली.
यावेळी ज्वेलरी शॉप मालक देवलाल गुजर यांनी प्रसंगावधान दाखवत या महिलेला पकडले आणि तिला पोलिसांच्या ताब्यात दिले. या महिलेचा चोरीचा फसलेला प्रयत्न सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. ही महिला बारबाला असून मिरारोड येथील एका बारमध्ये काम करते. या प्रकरणी तिच्या विरोधात अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.







