अहमदनगर (प्रतिनिधी) : आळेफाटा पोलिसांनी पाठलाग करुन तीन महिलांसह त्यांच्या एका साथीदाराला अटक केली असून, त्यांचा गुन्हा पाहून अनेकांना धक्काच बसला आहे. आळेफाटा बसस्थानकांत गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या अंगावरील मौल्यवान दागिने हातचलाखी करुन या महिला चोरी करायच्या. आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. नंदा संजय सकट (वय ३५), परीघा नाना राखपसरे (वय ६०), शोभा प्रताप खंदारे (वय ५५), संजय भानुदास सकट (वय ४६) सर्व राहणार इंदिरानगर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांनी दिलेली माहिती अशी की, आळेफाटा बस्थानक परिसरात १८ एप्रिल २०२२ रोजी बसमध्ये चढत असताना प्रवाशी महिलेच्या पर्समध्ये असलेले ५० हजार रूपये रोख रक्कम व १४ तोळे ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असे एकुन सात लाख पन्नास हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांनी तपास कमी एका पथकाची नेमणूक केली. आपले गाव आपली निगराणी या मोहिमेंतर्गत सुमारे ४०० सीसीटीव्ही कॅमेरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बसवण्यात आले असून पथकाने बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पहाणी केली असता एमएच १७ व्ही ३९१ इंडीका कार मधील तिन महिला व एक पुरूष यांच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. पथकाने श्रीरामपूर जि. अहमदनगर येथे वेशांतर करून १८ एप्रिल ते १९ मे असे तब्बल एक महिने इंडिकाकार बाबत सर्व माहीती मिळवली. तांत्रिक विश्लेषण आरोपी राहत असलेल्या येणार्या जाणार्या रोडवर बारीक लक्ष ठेवले.
दरम्यान आरोपी १९ मे रोजी गणेश चतुर्थी असल्याने राजुर जिल्हा जालना येथे गणपती मंदिर परिसरात चोरी करण्यासाठी जात असल्याची गोपनीय माहीती पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांना मिळाली. आरोपी कारमध्ये इंदिरानगर श्रीरामपूर येथुन निघाले असता साध्या वेशात असलेले पोलीस हवालदार विनोद गायकवाड, पोलीस हवालदार अमित माळुंजे यांनी कारचा पाठलाग केला.त्यांच्या मदतीला आळेफाटा येथून पथक रवाना झाले. कारचा १२५ किलोमीटर पाठलाग करत औरंगाबाद जिल्ह़्यातील वाळुंज येथे त्यांना ताब्यात घेण्यात आले.
नंदा संजय सकट (वय ३५), परीघा नाना राखपसरे (वय ६०), शोभा प्रताप खंदारे (वय ५५), संजय भानुदास सकट (वय ४६) सर्व राहणार इंदिरानगर ता. श्रीरामपूर जि. अहमदनगर अशी त्यांनी त्यांची नावे सांगितली. उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, उपनिरीक्षक रागीणी कराळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रा डुंबरे, विनोद गायकवाड, लहानु बांगर, भिमा लोंढे, प्रकाश जढर, अमीत माळुंजे, हनुमंत ठोबळे, मोहन आनंदगावकर, होमगार्ड प्रतिक जोरी, पोलीस मित्र संदीप गडगे, विजय ताजणे यांच्या पथकाने हि कामगिरी केली.
या आरोपींना आळेफाटा पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी आळेफाटा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बस्थानक परिसरात केलेल्या सहा चोर्या, एक घरफोडी, एक जबरी चोरी असे आठ गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपीकडून २४ तोळे सोने, १५ तोळे चांदी, एक कार असा १७ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यांच्याकडील चोरीचे सोने विकत घेणार्या विकास सुरेश कपिले (वय ३४, रा. सलबतपुर ता. नेवासा जि. अहमदनगर), जगदीश गजानन देवळालीकर (वय ४०, रा. रामचंद्र कुंज अहमदनगर शहर) या सराफाला अटक केली आहे.






