तुझ्यात दम नाही म्हटल्याचा राग आल्याने प्रियकराने केला प्रेयसीचा खून

dindoshi-police

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : तुझ्यात दम नाही..! असे म्हटल्याचा राग आल्याने एका २१ वर्षीय तरुणाने आपल्या प्रेयसीच्या पोटावर चाकूने सपासप वार करून व गळा चिरून तिची हत्या केली आहे. मुंबईच्या गोरेगाव परिसरात ही घटना घडली असून या आरोपीला मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे व गुन्हे शाखा, लोहमार्ग मुंबई यांनी १२ तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.

मंगळवारी पश्चिम रेल्वेच्या माहिम स्थानकाजवळ सकाळी ९ च्या सुमारास ट्रॅकवर एका गोणीत महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक केदारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेच्या मारेकऱ्याचा शोध सुरु झाला.

मृतदेह मिळालेल्या गोणीवर इंग्रजीत HARI OM DRUG GOREGAON असे मार्किंग होते. त्यावरुन एक पथकास गोरेगाव परिसरात रवाना करण्यात आले. या तपासा दरम्यान दिंडोशी पोलीस ठाण्यात एक महिला हरवल्याची तक्रार दाखल असल्याची माहीती मिळाली. सारीका दामोदर चाळके (वय ३०) असे या महिलेचे नाव असून ती गोरेगाव पूर्वच्या संतोषनगर येथे राहत असल्याची माहिती त्यांना मिळाली. पोलिसांनी या महिलेच्या पतीची चौकशी केली असता ही महिला २३ मे रोजी सकाळी ८ वाजता गोरेगावच्या सॅटेलाईट टॉवर येथे कामाला गेल्यानंतर घरी परतलीच नसल्याचे त्यांनी सांगितले.

यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटिव्ही फुटेजची पडताळणी केली असता त्यावरून सॅटेलाईट टॉवर मध्ये हाऊस किपिंगचे काम करणारा आरे कॉलनी येथे राहणार आरोपी विकास जगन खैरनार याच्यावर संशय आला. यावेळी त्याने चौकशीत सदर गुन्हा केल्याचे कबुल केले.

या प्रकरणी बुधवारी मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत मुंबईच्या पश्चिम परिमंडळ लोहमार्गचे पोलीस उप आयुक्त संदीप भाजीभाकरे यांनी सांगितले की, आरोपी विकास आणि सारीका हे सॅटेलाईट टॉवर मध्ये हाऊस किपींगचे काम करायचे. त्यांचे प्रेम संबंध होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात पैशांच्या कारणावरून वाद झाला. यावेळी सारिकाने विकासाला तुझ्यात दम नाही..! असे म्हटले. याचा गोष्टीचा विकासला राग आला.

हा राग मनात ठेऊन त्याने दिनांक २३ मे रोजी दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान सॅटेलाईट टॉवरच्या तिसऱ्या मजल्यावरील शौचालयामध्ये तिची हत्या केली. हत्येनंतर पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने आरोपीने महिलेचा मृतदेह प्लॅस्टीकच्या गोणीत कोंबुन तो कचरा असल्याचे भासवून टॉवरच्या बाहेर काढला. यानंतर तो मृतदेह रिक्षाने गोरेगाव रेल्वे स्टेशनवर आणून तेथुन चर्चगेट स्लो लोकलमध्ये चढविला आणि माहीम ते माटुंगा दरम्यान ट्रेनमधून फेकला. हा आरोपी दिंडोशी पोलिसांच्या ताब्यात असून. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here