पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. डीएचएफल प्रकरणी सीबीआयने ही कारवाई केली आहे. गेल्या महिन्यात भोसले आणि मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक विनोद गोएंका आणि शाहिद बलवा यांच्यासह आणखी दोन व्यावसायिकांशी संबंधित ठिकाणांवर सीबीआयने छापा टाकला होता. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली.
येस बॅंक,डीएचएफएल फसवणूक प्रकरणाच्या चौकशीच्या संदर्भात केंद्रीय अन्वेषण विभागाने मुंबई आणि पुण्यातील आठ ठिकाणांवर ३० एप्रिलला शोध मोहिम राबविली होती.पुण्यातील उद्योगपती अविनाश भोसले आणि मुंबईस्थित बांधकाम व्यावसायिक विवेक गोएंका आणि शाहिद बलवा यांच्यासह आणखी दोन व्यावसायिकांशी संबंधित ठिकाणांवर देखील छापे टाकण्यात आले होते.
सीबीआयने याप्रकरणी बांधकाम व्यावसायिक संजय छाबरिया यांना अटक केली होती. छाबरिया 6 मेपर्यंत सीबीआय कोठडीत आहेत.छाबरिया हे रेडिअस समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. डीएचएफएलमधून त्यांनी मोठे कर्ज घेतले होते.त्यातील तीन हजार कोटी रुपये थकवल्याचा आरोप आहे. याप्रकरणी मार्च 2020 मध्ये सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. अविनाश भोसले यांचे सगळ्याच पक्षातील अनेक नेत्यांशी चांगले संबंध आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीबीआयच्या कारवाईमुळे भोसले अडचणीत सापडले आहेत.







