सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : एकाच पोलिस ठाण्यात ५ वर्षे सेवा पूर्ण झालेल्या कर्मचार्यांच्या व ज्या कर्मचार्यांनी विनंती अर्ज केले आहेत अशांच्या ग्रामीण मुख्यालयातील ४०० पोलिसांच्या येत्या ४ ते ५ दिवसांत अंतर्गत बदल्या करण्यात येणार आहेत. या बदल्यांमध्ये पारदर्शीपणा ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिली.
पोलिस अधीक्षक सातपुते यांनी प्रत्येक कर्मचार्यांची समक्ष भेटून व नक्की कोणत्या कारणासाठी बदली पाहिजे याविषयी त्या कर्मचार्यांचे मत जाणून घेत आहेत. तसेच पोलिस कर्मचार्यांच्या अडचणी समजावून घेत आहेत. यात रिक्त जागा व विनंती अर्जाचा विचार करून बदली प्रक्रिया पार पाडत आहेत.
ग्रामीण पोलिस मुख्यालयाच्या अंतर्गत जिल्ह्यात २५ पोलिस ठाणी आहेत. यामध्ये अडीच हजारांपेक्षा जास्त पोलिसांची संख्या आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल ते सहायक फौजदार या पदावर कार्यरत असलेल्या ४०० पोलिसांच्या बदल्या होणार आहेत. पोलिस आयुक्तालयातील पोलिसांच्या बदल्या झाल्यानंतर ग्रामीण पोलिस मुख्यालयातील ४०० पोलिसांच्या बदल्याची प्रक्रिया ही जोरात सुरू आहे.






