ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : बायकोने भात केला नसल्याच्या वादातून नवऱ्याने तिचा खून केल्याची घटना भिवंडी लगत असलेल्या खोणी गावातील एका चाळीत घडली आहे. याप्रकरणी निजामपुरा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी नवऱ्याला अटक केली आहे.
या प्रकरणी नवरा शंकर वाघमारे (वय, २३) याला अटक करण्यात आली असून, ज्योत्स्ना ( वय, २०) असे हत्या झालेल्या बायकोचे नाव आहे. आरोपी शंकर हा भंगार विक्रेता असून तो भिवंडी लगत असलेल्या खोणी गावातील बाळाराम चौधरी यांच्या चाळीत भाड्याने मृत पत्नीसोबत राहतो. त्याचे मृत ज्योत्स्नासोबत वर्षभरापूर्वी लग्न झाले होते. त्यातच काल (मंगळवारी) रात्रीच्या जेवणात आरोपी नवऱ्याने भात शिजविण्यासाठी बायकोला सांगितले. मात्र तिने भात केलाच नाही. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला.
हा वाद एवढा विकोपाला गेला की, नवऱ्याने लाकडी दांडक्याने तिच्या डोक्यात, पाठीत पोटात बेदम मारहाण केली. या लाकडी दांडक्याच्या हल्ल्यात ती घरातच जमिनीवर पडल्याचे तिचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी त्याच्या घरात धाव घेतली. त्यावेळी बायको रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहून नवऱ्याला शेजाऱ्यांनी पकडून ठेवले. त्यानंतर घटनेची माहिती निजामपुरा पोलीस ठाण्यात दिल्यानंतर घटनास्थळी पोलीस पथक दाखल गंभीर जखमी अवस्थेत बायकोला इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
या गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस निरीक्षक अतुल लांबे यांनी सांगितले की, आरोपी मंगळवारी रात्रीच्या सुमारास घरी गेल्यावर त्याच्यासाठी बायकोला भात शिजविण्यासाठी सांगितले. यावरूनच दोघांमध्ये वाद होऊन जोरदार भांडण झाल्याने रागाच्या भरात बायकोच्या डोक्यात, पोटात, पाठीच्या कण्यावर लाकडी दांडक्याने प्रहार केला. आरोपी नवऱ्याला मंगळवारी रात्री उशिरा अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहितीही तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अतुल लांबे यांनी दिली आहे.







