मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : बँक खात्याची केवायसी अपडेट करावी लागेल, आपल्याला एक ओटीपी क्रमांक पाठवला आहे, तो लवकर सांगा. जर तुम्ही लवकरच ओटीपी क्रमांक दिला नाही, तर तुमच्या खात्यातील सर्व पैसे जप्त केले जातील म्हणत एका ठगाने तीर्थराज सूर्यप्रसाद द्विवेदी (वय ७१) या माजी सैनिकालाच लुटल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी मलबार हिल सायबर पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला असून ७१ वर्षीय माजी सैनिकाची आयुष्यभराची शिदोरी ठगाने ऑनलाइन उडवून नेली. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ७१ वर्षीय माजी सैनिक तीर्थराज सूर्यप्रसाद द्विवेदी हे मुंबईत राहतात. तर ड्रायव्हरची नोकरी करून आपला खर्च चालवतात. तीर्थराज सूर्यप्रसाद द्विवेदी हे १९६५ ते १९८५ या काळात देशासाठी सैन्यात कार्यरत होते. तर त्यांचा मुलगा हा देखील हवाई दलात होता. जो १९९८ मध्ये कारगिल युद्धात शहीद झाला. त्यामुळे सध्या तीर्थराज हे मुंबईत एकटेच राहतात.
तीर्थराज यांना २५ मे रोजी राहुल कुमार शर्मा नावाच्या व्यक्तीने त्यांना फोन केला. आणि मी बीओबी बँकेच्या दिल्ली मुख्य कार्यालयातील केवायसी व्यवस्थापक बोलतोय, असे सांगितले. तसेच तुम्हाला तुमच्या खात्याचे केवायसी अपडेट करावे लागेल असेही सांगितले. त्याचबरोबर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी क्रमांक पाठवला आहे, तो लवकर सांगा अन्यथा तुमच्या खात्यातील सर्व पैसे जप्त केले जातील असे सांगितले. त्यानंतर तीर्थराज घाबरले आणि त्यांनी OTP नंबर दिला. OTPनंबर दिल्यानंतर त्याच्या खात्यातून तीन वेळा १ लाख ३८ हजार रुपयांचे व्यवहार झाले.
माजी सैनिक तीर्थराज द्विवेदी यांनी सांगितले की, पैसे काढल्यानंतर मलबार हिल सायबर पोलिसात एफआयआर दाखल करण्यात आला आहे, परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. एवढेच नाही तर या माजी सैनिकाने पोलीस आणि अनेक नेत्यांना आपले पैसे परत मिळावेत, असे आवाहनही केले आहे.







