मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : माहीम परिसरामध्ये ड्रग्ज तस्करी करणाऱ्यांना माहीम गुन्हे शाखे पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत तस्करी करणाऱ्या आरोपी अहमद शेख (वय ६२) याला ११० ग्राम एमडीसह माहीममध्ये पकडले. जप्त केलेल्या एमडीची किंमत १२ लाख २५ हजार इतकी आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज तस्करी प्रकरणात यापूर्वी आरोपी अहमद शेखचा मुलगा आणि मुलीला पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांच्या ड्रग्ज तस्कर बापाला देखील माहीम गुन्हे शाखेकडून मंगळवारी अटक करण्यात आली. आज या आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून, पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.
माहीम पश्चिमेकडील कनाकिया टॉवरजवळील गल्लीत एक जण एमडीचा साठा घेऊन येणार असल्याची माहिती वरळी युनिटला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या परिसरावर पाळत ठेवली. दरम्यान अहमद शेख हा एमडी घेऊन तेथे येताच पोलिसांनी त्याला हटकले. तेव्हा पोलीस असल्याचे समजताच अहमदने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पकडून त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ ११० ग्राम एमडीचा साठा मिळाला. हे एमडी त्याने कुठून आणले व ते तो कोणाला विकणार होता, याचा पोलीस शोध घेत आहेत.
दरम्यान याआधी वरळी युनिटने अहमदचा मुलगा जावेद ऊर्फ जावा याला एक किलो १५० ग्राम वजनाच्या चरससह पकडला होते. तर, घाटकोपर युनिटने अहमदची मुलगी हजमा हिला १०० ग्राम एमडी आणि दोन किलो ७०० ग्राम चरस साठ्यासह पकडले होते. मुलगा व मुलगी नंतर आता त्यांचा बाप ड्रग्जसह पोलिसांच्या हाती लागला.







