राज्यपालांपाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही कोरोनाची लागण

मुंबई (संपादक सुनिल पाटील) : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे.

आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीला उद्धव ठाकरे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं नाना पटोले यांनी यावेळी सांगितलं. मुख्यमंत्री कार्यालयाकडून मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली. यानंतर काँग्रेस नेते कमलनाथ आणि नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आमचा एकही आमदार फुटला नसल्याचं यावेळी कमलनाथ यांनी सांगितलं. तसंच उद्धव ठाकरे कोविड पॉझिटिव्ह असून फोनवरुन त्यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती दिली.

काँग्रेस आमदारांची बैठक पार पडली आहे. या बैठकीला ४४ पैकी ४१ आमदार उपस्थित होते. तीन आमदार प्रवासात आहेत. काँग्रेस पक्षात एकता आहे, उद्धव ठाकरेंना कोरोनाची लागण झाली असून माझी त्यांच्याशी फोनवरुन चर्चा झाली. काँग्रेस महाविकास आघाडी सरकारच्या पाठीशी राहील असं आश्वासन दिलं आहे. भाजपाने झारखंड, अरुणाचल प्रदेश, मध्य प्रदेशात ज्या प्रकारे पैसा आणि पदाचं राजकारण केलं तसंच राजकारण सुरु आहे. हा आपल्या संविधानाशी खेळ आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेत एकता कायम राहील याचा आम्हाला विश्वास आहे, असं कमलनाथ यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here