मुंबई (उपसंपादक अनिल साळवी) – ठाणे पोलीस आयुक्तालयातील सहा. पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे किसन गवळी हे सांगली जिल्हा येथे मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असतांना तपासावर असलेल्या मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन गु.रजि. क. 1 ६३/२०१० भा.द.वि. कलम ३७६ (फ), ३०२, २०१ या गुन्हयामध्ये एका ९ वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर आरोपीतांनी बलात्कार करून तिची कुर हत्या केली. सदर गुन्हयात कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसताना गुन्हयाचे तपासात मिळुन आलेले परिस्थितीजन्य आणि वैज्ञानिक सबळ पुराव्याच्या आधारे आरोपीतास अटक करून मुदतीत मा. जिल्हा व सत्र न्यायालय सांगली या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
खटल्याच्या सुनावणीमध्ये मा. न्यायाधिश, सत्र न्यायालय सांगली यांनी तपासामधील पुराव्यांच्या आधारे दिनांक ०६/११/२०१२ रोजी आरोपीतास ‘फाशीची शिक्षा ठोठावली. आरोपीताने शिक्षेविरूध्द केलेल्या अपिलाच्या सुनावणीत मा. उच्च न्यायालयाने सन २०१३ मध्ये फाशीची शिक्षा कायम केली. आरोपीताने सदर शिक्षा आदेशास मा. सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याने प्रस्तुत अपिलाचे सुनावणीमध्ये दिनांक १७/०१/२०१९ रोजी मा. सर्वोच्च न्यायालयाने आरोपीतास ३० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
प्रस्तुत गुन्हयाचे सर्वोत्कृष्ट गुणात्मक अन्वेषण आणि अपराधसिध्दीबाबत सहा. पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे किसन गवळी यांना “केंद्रिय गृहमंत्री पदक-२०२०’ प्रदान करण्यात आले. याकरीता, विवेक फणसळकर, पोलीस आयुक्त, ठाणे यांनी सहा. पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे किसन गवळी यांचे अभिनंदन केले व पुष्पगुच्छ देवुन यथोचित सत्कार केला. सदरवेळी अपर पोलीस आयुक्त, गुन्हे प्रविण प्रवार, पोलीस उप आयुक्त, गुन्हे दिपक देवराज व गुन्हे शाखेचे अन्य अधिकारी हजर होते.
सहा. पोलीस आयुक्त, शोध-१, गुन्हे शाखा, ठाणे किरान गवळी यांनी केलेल्या तपासाबाबत पोलीस आयुक्त यांनी प्रशंसा करून इतर अधिकाऱ्यांनीदेखील यातुन प्रेरणा घेवुन अशाच प्रकारे गुणात्मक तपास करण्याबाबत आवाहन केले.यापुर्वी ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस उप आयुक्त, गुन्हे, ठाणे दिपक देवराज आणि पोलीस निरीक्षक प्रदिप भानुशाली, गुन्हे शाखा, ठाणे यांनादेखील उत्कृष्ट अन्वेषण व अपराधसिध्दीबाबत “केंद्रिय गृहमंत्री पदक-२०१९” प्राप्त झालेले आहे.







