निजामाबाद ( तेलंगणा ) : जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग ४४ वरील बुस्सापूर, मेंदोरा मंडल येथील तेलंगणा ग्रामीण बँकेत मास्क घातलेल्या काही दरोडेखोरांनी गॅस कटरने बँकेचे लॉकर फोडून ४.४६ कोटी रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामविकास समिती इमारतीच्या मजल्यावरील कुलूप उचकटून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला. त्यांनी सोबत आणलेल्या गॅस सिलिंडरसह कटरच्या सहाय्याने स्ट्रॉंगरूमचे कुलूप काढले. बँकेत दोन लॉकर असताना, ज्या मोठ्या लॉकरमध्ये सोने तारण म्हणून ठेवले होते, त्याची नासधूस करण्यात आली. यामध्ये ७.३० लाख रुपये रोख, ८.३ किलो सोन्याचे दागिने आणि कागदपत्रांचा समावेश आहे.
गॅस कटरने लॉकरचा दरवाजा कापण्याच्या प्रक्रियेत आगीच्या ठिणग्या पडल्याने काही रोकड व कागदपत्रे जळून खाक झाली. दरोडेखोरांनी गॅस सिलिंडर तेथेच टाकून सोने घेऊन पळ काढला. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे फोडून व्हिडिओ रेकॉर्ड करणारा डीव्हीआर काढून घेतला. दरोडेखोर अस्वलाच्या आकाराचे मुखवटे घालून आले आणि त्यांनी बँकेच्या आवारात मास्क टाकले.
शनिवारी मध्यरात्री हा दरोडा पडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. रविवारी सकाळी बँकेच्या खाली असलेल्या हॉटेलमध्ये आलेल्या काही जणांना जळण्याचा वास आला, मात्र ते तिकडे गेले नाहीत. बँकेला सुट्टी असल्याने एकही कर्मचारी आला नाही. सोमवारी सकाळी कामावर आलेल्या कर्मचाऱ्यांनी बँकेतील परिस्थिती पाहून पोलिसांत तक्रार दाखल केली. क्लूज टीमने बोटांचे ठसे गोळा केले. चोरटे बँकेच्या इमारतीच्या समोरून आले नसून, शाळा आणि बीएसएनएलच्या जुन्या एक्सचेंजच्या भिंतीच्या मागून आल्याचे आढळून आले आहे.







