पुण्यात सिगारेट न दिल्याने मित्रांनी केला १५ वर्षाच्या मुलाचा खून

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : अल्पवयीन मित्र एकत्र येऊन पार्टी करत असतांना, दारु पित नाचगाणे सुरु होते. यावेळी एकाने १५ वर्षाच्या मित्राकडे सिगारेटची मागणी केली. त्याने सिगारेट देण्यास नकार दिल्याच्या राग आल्याने, डोक्यात कोयत्याने वार करून निर्घृण खून केल्याची घटना मोशी येथील जुना जकात नाका येथे सोमवारी (दि. ४) दुपारी घडली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, सुमित सतीश बनसोडे (वय १५, रा. बनकरवस्ती, मोशी) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी पाच मुलांना ताब्यात घेतले आहे. मयत सुमित याच्या एका मित्राची कबुतराची ढाबळ आहे. त्या ढाबळीत डुडुळगाव येथील एकजण येऊन गेल्याचा संशय सुमित आणि त्यांच्या इतर मित्रांना होता. ज्याच्यावर त्यांचा संशय होता त्याची देखील कबुतरांची ढाबळ होती. संशयावरून त्याला मारण्यासाठी सुमितच्या मित्राने त्याला इंस्टाग्रामवर मेसेज करुन भेटण्यासाठी बोलावून घेतले. तो आल्यानंतर त्याला मारण्याचा कट रचला. त्यासाठी त्याने सोमवारी सकाळपासून सुमित आणि त्याचे मित्र एकत्र आणण्यास सुरुवात केली. अकराच्या सुमारास सुमित याच्यासह पाच ते सात मित्र एकत्र आले. ते सर्वजण मोशी येथील जुन्या जकात नाक्याजवळ असलेल्या जंगलात गेले.

जंगलात सर्वांनी दारु पिऊन मोबाईलवर गाणी लावून नाचू लागले. त्यावेळी सुमितकडे सिगारेट असल्याने, त्याच्या एका मित्राने सुमितकडे सिगारेट मागितली. त्याने सिगारेट देण्यास नकार दिला. याचा राग आल्याने, मित्रांनी सुमितच्या डोक्यात कोयत्याने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने सुमितचा जागीच मृत्यू झाला. सुमितचा मृत्यू झाल्याचे समजताच सर्वजण घटनास्थळावरुन पळून गेले.

सुमितची आई एका स्कुलबसवर अटेंडंट म्हणून काम करते. सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घरी आली असता सुमित घरी नसल्याने त्यांनी त्याचा शोध घेतला. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास सुमितच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात धाव घेत सुमित बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेत सुमितचा शोध सुरु केला.

सुमितचा खून झाला त्यावेळी त्याठिकाणी उपस्थित असलेला एक मित्र सोमवारी दिवसभर सुमितच्या आईसोबत होता. तो सुमितच्या आईसोबत फिरुन त्याचा शोध घेत होता. मंगळवारी सकाळी पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्याने पोलिसांना सुमित जुना जकात नाक्याजवळ झाडाखाली झोपल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सुमितचा मृतदेह मिळून आला. पोलिसांना मित्रावर संशय आल्याने त्याच्याकडे सखोल चौकशी केली. त्यावेळी त्याने पाच ते सहा साथीदारांनी मिळून सुमितचा खून केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here