मुंबई (विशेष प्रतिनिधी) : कंपनी तोट्यात असल्याचे दाखवत भारतात कर न भरणे, मात्र दुसरीकडे आपल्या मूळ चिनी कंपनीला तब्बल ६२ हजार ४७६ कोटी रुपये पाठविणे, अशी फसवणूक आणि मनी लाँड्रिंग केल्याप्रकरणी ईडीने व्हीवो कंपनीची ४६५ कोटी रुपयांची मालमत्ता बुधवारी जप्त केली.
कंपनीमधील चिनी समभागधारकांनी भारतामध्ये आपली बनावट ओळख सादर केल्याचे उजेडात आल्यानंतर कंपनीत काहीतरी काळेबेरे असल्याचा संशय तपास यंत्रणांना आला होता. या प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला होता. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैशांचे व्यवहार झाल्याची माहिती पुढे आल्यावर ईडीने तपास सुरू केला होता. या छाप्यांदरम्यान कंपनीत कार्यरत भारतीय तसेच चिनी कर्मचाऱ्यांची ईडीने चौकशी केली. मात्र, ईडीचे अधिकारी कार्यालयात आल्यानंतर काही कर्मचाऱ्यांची तेथून पळ काढल्याचे समजते. तसेच, काही महत्त्वपूर्ण डिजिटल उपकरणेदेखील लपविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आता ईडीने ही उपकरणे ताब्यात घेतली असून त्याद्वारेदेखील अधिक तपास केला जाणार आहे.
जप्त केलेल्या ११९ बँकांत असलेल्या ६६ कोटी रुपयांच्या मुदत ठेवी, दोन किलो सोने, ७३ लाख रुपयांची रोख रक्कम अशा मालमत्तेचा समावेश आहे. व्हीवो या चिनी कंपनीवर तसेच कंपनीशी संबंधित अन्य काही चिनी कंपन्यांच्या मुंबई, दिल्लीसह, उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा या राज्यांत मंगळवारी एकूण ४८ ठिकाणी ईडीने छापेमारी केली होती. या छापेमारीतून जी कागदपत्रे ईडीच्या ताब्यात लागली, त्यावरून कंपनीने भारतीय कर प्रणालीची काही हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उजेडात आले आहे.व्यवहार तपास यंत्रणांच्या रडारवर आल्यानंतर कंपनीचे तत्कालीन संचालक बीन लू २६ एप्रिल २०१८ रोजी भारतातून चीनमध्ये परत गेले.







