कोरोनामुळे मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी धनंजय मुंडे यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना पत्र

अलिबाग-सोगावकर – कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या मराठवाड्यातील दोन पत्रकारांच्या कुटुंबियांना सरकारने घोषणा केल्याप्रमाणे पन्नास(५०) लाख रुपये विमा संरक्षण अंतर्गत मदत करावी, अशी मागणी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
कोरोना काळात कर्तव्यावर असताना पत्रकाराचा कोरोनाने मृत्यू झाला, तर सरकारने कुटुंबियांना विमा संरक्षण अंतर्गत पन्नास (५०)लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली होती. बीड जिल्ह्यातील गेवराई येथील पत्रकार संतोष भोसले (वय 48) व लातूर येथील ज्येष्ठ पत्रकार गंगाधर सोमवंशी (वय 61) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दोन्ही पत्रकारांची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असून महाविकास आघाडी सरकारने घोषणा केल्याप्रमाणे दोन्ही पत्रकारांना सरकारने घोषणेनुसार त्यांना मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी एका निवेदनाद्वारे धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती.
याची तात्काळ दखल घेत धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्य मंत्र्यांकडे सरकारने घोषणा केल्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करावी, असे पत्र दिले आहे. धनंजय मुंडे यांनी पत्रकारांच्या मागणीवर सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल राज्यभरातील पत्रकारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here