ठाणे (सहसंपादक सतीश बनसोडे) : ठाण्यामध्ये मुसळधार पाऊस पडतोय. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले आहे. यामुळे अपघातांनाही आमंत्रण मिळत आहे. सोमवारी रात्री ठाण्यातील मुंब्रा परिसरातील खर्डीगाव फडकेवाडा येथे रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने कार थेट तलावामध्ये बुडाली. दैव बलवत्तर म्हणून कारचालक बालंबाल बचावला.
मुसधळार पावसामुळे तलावाचे पाणी हे तुडुंब भरून ओसांडून वाहून रस्त्यावर आले होते. रस्त्यावरील पाणी आणि तलावाचा अंदाज न आल्याने कार तलावात बुडाली. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती मिळतात स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत वाहनचालकाला सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दल आणि ठाणे आपत्ती व्यवस्थापन पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत कार बाहेर काढली.
अपघातात बचावलेला चालक वाय. पठान (वय २८) असून तो एका खासगी कंपनीमध्ये ड्रायव्हरचे काम करतो. काम संपल्यानंतर तो मुंबईमधील घराकडे परतत असताना हा अपघात झाला.







