नाशिक (विशेष प्रतिनिधी) : येथील तनिष्क शोरुममधून दोन लाख १६ हजार रूपये किंमतीच्या सोन्याच्या बांगड्या लंपास करणा-या महिलेविरुध्द सरकारवाडा पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शोरूममध्ये खरेदीसाठी आलेल्या या महिलेची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
शरणपूर रोडवरील तनिष्क शोरूमचे अपूर्व लक्ष्मण दराडे यांनी या चोरीप्रकरणी तक्रार दिली आहे. या तक्रारीत म्हटले आहे की, १४ जुलै रोजी दुपारी १ वाजून १० मिनिटांनी आरोपी अंजू चोपडा या या सोन्याच्या बांगड्या बघण्याकरिता आल्या होत्या. त्यांना बांगड्या पसंत आल्या नाही. त्या दुपारी दीड वाजता दुकानातून निघून गेल्या. त्यानंतर १५ जुलैस रात्री १०.३० वाजता शोरूम मधून विक्री झालेला व शिल्लक असलेला स्टॉक तपासल्यानंतर बांगडया कमी असल्याचे आढळले.
या स्टॉक तपासणीत ३६.२०९ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या मिळून आल्या नाही. त्यानंतर सीसीटीव्हीचे फूटेज तपासले. तेव्हा त्यातून १४ जुलैस दुपारी अंजू चोपड़ा यांनी बांगड्या चोरून नेल्याचे आढळले. या चोरीप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करीत आहे.






