सोलापूर जिल्ह्यात माणूसकीला काळीमा फासणारी घटना : पोरीला पळवलं म्हणून पोराच्या बापाला झाडाला बांधून बेदम मारहाण

सोलापूर (विशेष प्रतिनिधी) – विठ्ठलाची नगरी असलेल्या आणि संत दामाजी यांची पुण्यभूमी असलेल्या सोलापूर जिल्ह्यात माणूसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. मंगळवेढ्यातील भाळवणी गावात एका तरूणाचा गावातीलच मुलीवर जीव जडला. या प्रेमातून दोघांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला. मात्र आता मुलीकडच्या नातेवाईकांनी मुलाच्या वडिलांना झाडाला बांधून बेदम चोप दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
आपल्या मुलीला पळवून नेल्याचं समजताच मुलाकडच्या नातेवाईकांना संताप अनावर झाला. नातेवाईकांच्या जमावानं मुलाच्या वडिलांना घरापासून 3 किमी अंतरावरून गावात मारहाण करत आणलं. एवढंच नव्हे तर गावातील भर चौकात लिंबाच्या झाडाला बांधून मारहाणही केली. गावाच्या मध्यभागीच हा प्रकार घडल्यानं नागरिकांची एकच झुंबड उडाली. या नातेवाईकांनी तरूणाच्या वडिलांना बेदम चोप दिला. मात्र काही अनुचित प्रकार घडण्याच्या आधीच गावातील काही नागरिकांनी या वडीलांची नातेवाईकांच्या तावडीतून सुटका केली.
दरम्यान या प्रकरणातील मुलगा आणि मुलगी वेगवेगळ्या समाजातील आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांनी पळून जाऊन लग्न केले आणि पोलिसांसमोर हजर झाले होते. यावेळी दोन्ही पालकांनी पोलिसांसमोर पुन्हा लग्न लावून देण्याचे कबूल केल्यावर मुलगी घरी गेली होती. मात्र आपले लग्न लावले जाणार नाही याचा अंदाज आल्यावर हे दोघे पुन्हा पळून गेले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here