अभिनेत्री अमिषा पटेलला कोर्टाकडून वॉरंट

amisha-patel

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : अभिनेत्री अमिषा पटेलच्या विरोधात मुरादाबाद येथील एसीजेएम-५ न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे. कोर्टाच्या सुनावणीला हजर न राहिल्याने बॉलिवूड अभिनेत्री अमिषा पटेल विरोधात वॉरंट काढण्यात आलं आहे. आता अमिषा पटेलला २० ऑगस्ट २०२२ रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीसाठी एसीजेएम-५ च्या कोर्टात हजर राहावे लागणार आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथील न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू आहे.

 

चित्रपट अभिनेत्री अमिषा पटेल आणि तिच्या सहकाऱ्यावर ११ लाख अ‍ॅडव्हान्स घेऊनही कार्यक्रमात उपस्थित न राहिल्याचा आरोप आहे. एका लग्नाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून तिला नृत्य सादर करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. मात्र पैसे घेऊनही अमिषा या कार्यक्रमाला आली नाही. त्यामुळे हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या ड्रीम व्हिजन इव्हेंट कंपनीचे मालक पवनकुमार वर्मा यांनी अमिषा पटेल यांच्याविरोधात तक्रार नोंदवली आहे.

 

याबाबत अमिषा पटेल विरोधात खटला दाखल करणाऱ्या इव्हेंट कंपनीचे मालक पवन कुमार वर्मा यांनी माहिती दिली की, त्यांनी फक्त अमिषाला अ‍ॅडव्हान्स पैसेच दिले नव्हते तर, मुंबई ते दिल्ली आणि दिल्ली ते मुंबई असा प्रवास त्याचबरोबर दिल्लीत महागड्या हॉटेल्समध्ये तिच्या राहण्याची सोयदेखील केली होती. मात्र अमिषा पटेलने दिल्लीत येऊनही, मुरादाबाद दिल्लीपासून दूर असल्याचे कारण देत कार्यक्रमाला न आल्याचा आरोप केला आहे.

 

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे आयपीसी कलम १२०-बी, ४०६,५०४ आणि ५०६ अंतर्गत अमिषा पटेलविरुद्ध दाखल झालेल्या गुन्ह्यात सुनावणी सुरू आहे. परंतु पहिल्या सुनावणीला अमिषा कोर्टात उपस्थित नव्हती. आता वॉरंट जारी करूनही अमिषा पटेल कोणतेही ठोस कारण न देता न्यायालयात पुढील सुनावणीला हजर राहिली नाही, तर न्यायालय तिच्याविरुद्ध जामीन नामंजूर करू शकते. अमिषा पटेल वादात सापडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही चेक बाऊन्स झाल्यामुळे भोपाळ कोर्टात तिच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here