बाडमेर (राजस्थान) : पगार कमी असल्यामुळे कौटुंबिक खर्च भागत नव्हता. त्यामुळे पती-पत्नीमध्ये अनेकदा पैशांवरून वाद होत होते. बुधवारी पुन्हा पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. वाद इतका विकोपाला गेला की, पत्नीने चक्क बेल्टने गळा आवळून पतीची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली.
अनिल कुमारच्या आईने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, बाडमेर जिल्ह्यातील कोतवाली गावात राहणाऱ्या अनिल कुमार (वय ३२) या युवकाचा मंजूश्री (वय २८) हिच्यासोबत २०१८ साली विवाह झाला होता. अनिल कुमार हा एका खासगी कंपनीत कामाला होता. मंजूश्री हिला महागडे वस्तू खरेदी करण्याची आवड होती. त्याचबरोबर तिला दारू आणि सिगारेटचं व्यसनही होतं. दरम्यान, पतीचा पगार कौटुंबिक खर्चात कमी पडत असल्याने मंजूश्री आणि अनिल कुमार यांच्यात नेहमी वाद व्हायचे.
बुधवारी मंजूश्रीने पती अनिलला घरी येताना मद्याची बॉटल आणण्यास सांगितलं. पत्नीचा हट्ट पुरवण्यासाठी अनिल कुमारने मद्याची बॉटल आणली. रात्री दोघांनीही मद्यप्राशन केलं. दरम्यान, दोघांमध्येही पैशांवरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, मंजूश्रीने दारूच्या नशेत बेल्टने पती अनिल कुमारचा गळा आवळला. पती-पत्नीमध्ये सुरू असलेला वाद सोडवण्यासाठी दुसऱ्या खोलीत झोपलेली अनिलच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंजूश्रीने बेल्टने अनिलचा गळा इतका घट्ट आवळला होता की, या घटनेत अनिल कुमारचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, अनिलच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पत्नी मंजूश्री हिला अटक केली आहे. पोलिस चौकशीत तिने आपला गुन्हाही मान्य केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.