‘टाइमपास ३’ चित्रपटातील धमाल गाणे होते आहे लोकप्रिय

timepass-3-new-song

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : टाइमपास ३ च्या टिझर आणि ट्रेलरमधून एका गाण्याच्या केवळ एकाच ओळीने प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली होती. ‘याच्या रिक्षाच्या हॉर्नमधनं आली वाघाची डरकाळी’ ! अशी या गाण्याची ओळ होती. ही एवढी एकच ओळ ऐकून हे गाणं धमाल असणार आहे, हे आधीच प्रेक्षकांनी ओळखलं होतं. त्यामुळे सर्व प्रेक्षक फार उत्सुकतेने या गाण्याची वाट बघत होते. अखेर त्यांची ही प्रतिक्षा संपली असून नुकतंच हे गाणं प्रदर्शित झालं आहे.

‘टाइमपास’ म्हटलं की डोळ्यासमोर येते ती दगडू-प्राजूची जोडी आणि त्यांची आगळी वेगळी लव्हस्टोरी. पहिल्या भागात प्रेक्षकांच्या मनाला हुरहूर लावून अधुरी राहिलेली प्रेमकथा दुसऱ्या भागात प्रेक्षकांना आनंद देत पूर्ण झाली. पहिल्या भागात बालपणात एकमेकांपासून दुरावलेले दगडू आणि प्राजू दुसऱ्या भागात तरुणपणात एकमेकांना भेटले आणि एकही झाले. याच बालपण आणि तरुणपणाच्या मधल्या टप्प्यात दगडूचं नेमकं काय झालं ? प्राजू त्याच्यापासून दूर गेल्यानंतर त्याच्या आयुष्यात काय काय बदल झाले? हे सांगणारी गोष्ट आता टाइमपास ३ मधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटातील एक धमाल गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.

वैशाली सामंतच्या ठसकेबाज आवाजाचा तडका लागलेलं आणि कृतिका गायकवाडच्या दिलखेचक अदांनी सजलेलं हे गाणं धमाका उडवून देण्यास सज्ज झालं आहे. टाइमपासच्या यापूर्वीच्या दोन्ही भागातील गाणी विशेष लोकप्रिय झाली होती. रोमॅंटिक गाण्यांबरोबरच पहिल्या भागातील ‘ही पोली साजूक तुपातली’ आणि दुसऱ्या भागातील ‘ऍम्ब्युलन्स सॉंग’ने सर्वत्र एकच धम्माल उडवून दिली होती. तशीच धम्माल उडवून द्यायला आणि दंगा घालायला टाइमपास ३ मधील ‘वाघाची डरकाळी’ आलं आहे.

क्षितीज पटवर्धनचे शब्द असलेल्या या गाण्याला अमित राज यांनी संगीतबद्ध केलं आहे तर वैशाली सामंत यांनी या गाण्याला आवाज दिला आहे. या चित्रपटातील इतर गाण्यांप्रमाणेच यंदाही गाण्याचं जोशपूर्ण ढंगातलं नृत्य दिग्दर्शन राहुल ठोंबरे आणि संजीव होवालदार यांनी केले आहे. तर कृतिका गायकवाडने या गाण्यावर ठेका धरत दिलखेचक अदा पेश केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here