धमकीसह महिलांविषयी आक्षेपार्ह संवादाच्या रेकॉर्डिंगचा पेनड्राइव्ह सादर केल्यानंतर सभागृहात खळबळ
मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : मध्यप्रदेशमध्ये जाण्यासाठी महाराष्ट्र आरटीओ चेक पोस्टवर वाहनधारकांकडून हजारो रुपयाची वसुली केल्या जात प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथराव खडसेंनी सभागृहात पेनड्राइव्ह सादर केला आहे. तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील माफियांची रेकॉर्डिंगही अध्यक्षांना दिली आहे. या रेकॉर्डींगमध्ये तहसीलदारांना धमकीसह महिलांविषयी आक्षेपार्ह संवाद असल्याचेही खडसे यांनी सभागृहात सांगितले. खडसे यांनी वक्फ बोर्ड जमीन, रोहिणीताई खडसेंवरील हल्ल्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांसह सरकारला धारेवर धरले.
माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी आज विधानपरिषदेत पेन ड्राईव्ह सादर केला. यात त्यांनी मुक्ताईनगर मतदारसंघाला लागून असणार्या पुरनाड येथील आरटीओच्या आंतरराज्यीय चेकनाक्यावरील गैरव्यवहाराची माहिती सादर केली. यात त्यांनी प्रत्येक ट्रक धारकापासून एक ते दोन हजार रूपये घेण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. यातून दिवसाला किमान दहा ते बारा लाख रूपयांचा घोळ होत असल्याचा आरोप खडसे यांनी केला.
दरम्यान, खडसे पुन्हा म्हणाले की, वक्फ बोर्डाच्या जमीनीतील गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहे. यात आष्टी तालुक्यात एक हजार रूपयांपेक्षा जास्तचा घोळ झाला असून येथे एसआयटीची चौकशी सुरू आहे. यातील चौकशीत अनेक राजकीय नेत्यांची नावे येऊन देखील यावर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. तर याची चौकशी करणार्या पंकज कुमावत यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या ऐवजी कनीष्ठ अधिकार्याकडे या तपासाला सोपविण्यात आले आहे. याची तातडीने चौकशी करण्याचा आरोप नाथाभाऊंनी केला. यात काही राजकारणी आणि आमदारांचाही समावेश असल्याचा आरोप नाथाभाऊंनी केला.
नाथाभाऊ यांनी नंतर त्यांची कन्या रोहिणीताई खडसे यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणावर भाष्य केले. ते म्हणाले की, यात तीन जणांच्या विरोधात गंभीर कलमांच्या खाली गुन्हे दाखल करण्यात आले. यात आजवर या तिन्ही जणांवर कारवाई करण्यात आलेली नाही. तत्कालीन सरकारने नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. मात्र त्यांनी चौकशी केली नाही. मात्र, पोलिसांनी आरोपींना संरक्षण दिले. यात छोटू भोई यांच्या विरोधात २००५ पासून अतिशय गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. याच गुंडांना राज्याचे मुख्यमंत्री संरक्षण देत असल्याचा आरोप त्यांनी केला. या संपूर्ण घटनेची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
यानंतर त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यात महिलांना देण्यात आलेल्या धमक्यांचे ऑडिओ रेकॉर्डींग सादर केले. यात त्यांनी महिलांना धमकावून त्यांना अश्लील शिवीगाळ करण्यात येत असून याचे पुरावे आपण सादर करत असल्याचे सांगितले. या प्रकरणी तातडीने या घटनेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नाथाभाऊंनी केली







