पुणे पोलिसांनी केले सराईत मोबाईल चोरट्यांना जेरबंद; २१ मोबाईल हस्तगत

mobile-thief

पुणे (जिल्हा प्रतिनिधी हितेंद्र पाटील) : स्वारगेट बसस्थानक तसेच शहरातील गर्दीच्या ठिकाणांवरुन नागरिकांकडील मोबाइल संच लांबविणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पकडले. स्वारगेट पोलिसांनी चोरट्यांकडून २१ मोबाइल संच जप्त केले.

 

या प्रकरणी पोलिसांनी विकास उर्फ कात्या सुरेश वाघरे (वय २१), शुभम उर्फ सोनू विजय रजपूत (वय २५, दोघे रा. येरवडा) या चोरट्यांना अटक केली असून, यातील वाघरे सराईत चोरटा आहे. शहरात पादचारी नागरिकांकडील मोबाइल संच हिसकावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. स्वारगेट परिसरात नागरिकांकडील मोबाइल हिसकावण्यात आले होते. स्वारगेट परिसरात मोबाइल हिसकावणारे चोरटे थांबल्याची माहिती गस्त घालणाऱ्या स्वारगेट पोलिसांच्या पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावला. पोलिसांना पाहताच वाघरे आणि रजपूत पळाले. पोलिसांनी पाठलाग करुन दोघांना पकडले.

 

तपासात दोघांकडून २१ मोबाइल संच जप्त करण्यात आले. दोघांनी शहरातील गर्दीच्या ठिकाणांवरून मोबाइल हिसकावून नेल्याची कबुली दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रशांत संदे, उपनिरीक्षक अशोक येवले, फिरोज शेख, किरण भरगुडे, प्रवीण गोडसे आदींनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here