बिहारमध्ये सरकारी इंजिनिअरच्या घरावरील धाडीत कोट्यवधींची रोकड जप्त

Crores-of-cash-seized-in-a-raid-on-the-house-of-a-government-engineer

पाटणा (बिहार) : बिहारच्या ग्रामीण बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंत्याच्या घरातून कोट्यवधींचे घबाड जप्त करण्यात आले आहे. व्हिजिलन्स टीमने कार्यकारी अभियंता संजय कुमार राय यांच्या किशनगंज आणि पाटणा येथील काही ठिकाणांवर शनिवारी छापेमारी केली. यावेळी त्याच्या घरातून सुमारे ५ कोटी रुपयांची कॅश जप्त करण्यात आली आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर दागिनेही जप्त करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

व्हिजिलन्स टीमने भ्रष्ट इंजिनिअर संजय रायविरुद्ध बेहिशोबी मालमत्तेचा गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी त्याच्या पाटण्यातील किशनगंज आणि दानापूर येथील दोन ठिकाणी छापे टाकण्यात आले. संजय राय किशनगंज विभागात तैनात आहेत. त्याच्या घरात एवढे मोठे घबाड पाहून व्हिजिलन्स टीमच्या आधिकाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.

जप्त करण्यात आलेली कॅश जवळपास ५ कोटी रुपये असल्याचे बोलले जात आहे. मात्र, नोटांची पूर्ण मोजणी झाल्यानंतर, नेमकी किती रक्कम जप्त करण्यात आली हे समजू शकेल. सध्या संजय रायच्या किशनगंज येथील ठिकाणी व्हिडिलन्स टीमचे जवळपास १४ अधिकारी उपस्थित आहेत.

छापेमारीची ही कारवाई डीएसपी अरुण पासवान यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कार्यकारी अभियंता संजय रायचा कॅशियर खुर्रम सुल्तान आणि खाजगी अभियंता ओमप्रकाश यादव यांच्याकडेही मोठ्या प्रमाणावर कॅश मिळाली आहे. हिचीही मोजणी सध्या सुरू आहे. डीएसपींनी दिलेल्या माहितीनुसार, मोठा प्रमाणावर कॅश मिळाली असून मशीनच्या सहाय्याने मोजणी सुरू आहे. आतापर्यंत २ कोटींहून अधिकची मोजणी झाली आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here