विद्यमान संचालक मंडळ कायम ठेवण्याचे आदेश
जळगाव (संपादक सुनिल पाटील) : राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या युतीचे सरकार स्थापन झाल्यावर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखालील जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले होते. त्या ठिकाणी प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, औरंगाबाद खंडपीठाने प्रशासक नियुक्ती अवैध ठरवित संचालक मंडळ कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांना दिलासा मिळाला असून शिंदे-फडणवीस सरकारला जोरदार चपराक बसली आहे.
जळगाव जिल्हा दूध संघावर एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ कार्यरत होते. खडसे यांच्या पत्नी मंदाताई खडसे या संघाच्या अध्यक्षा आहेत. राज्यात सत्तातंर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने जळगाव जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त करून त्या ठिकाणी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या मुख्य प्रशासकीय नेतृत्वाखाली प्रशासक मंडळ नियुक्त केले होते.
याबाबत माहिती देताना खडसे यांनी सांगितले, की न्यायालयाने राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. तसेच, ही प्रशासक नियुक्ती रद्द करण्याबाबतच्या आदेशविरूध्द सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी या आदेशाला स्थगिती देण्याची मागणीही प्रशासक मंडळातर्फे करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावली. तसेच, राज्य सरकारने जी जिल्हा दूध संघाची चौकशी लावली होती, ती सुध्दा थांबविण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. तसेच, एन. जे. पाटील यांनी जे आरोप संचालक मंडळावर केले आहेत. तेसुध्दा न्यायालयाने फेटाळले असल्याचे खडसे यांनी सांगितले. निकालाच्या बाबतीत बोलताना खडसे म्हणाले, सत्याचा नेहमी विजय होत असतो. न्यायालयाच्या या निकालाने राज्य सरकारला चांगलीच चपराक दिली आहे.
राज्य सरकारच्या या निर्णयाविरूध्द संचालक मंडळाने औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर आज (ता. ३० ऑगस्ट) निर्णय झाला असून न्यायालयाने जिल्हा दूध संघावरील प्रशासक मंडळ अवैध ठरवित विद्यमान संचालक मंडळाला पुन्हा अधिकार बहाल केले आहेत, माहिती एकनाथ खडसे यांनी दिली.







