जामनेर (प्रतिनिधी) : जिल्हा पोलीस दलातील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका पोलीस कर्मचाऱ्यासोबत बोलताना मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होताच मराठा समाज आक्रमक झाला होता. नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर यांनी बुधवारी रात्री उशिरा बकाले यांच्या निलंबनाचे आदेश काढले होते. मराठा समाज राज्यभरात प्रचंड आक्रमक झाला असून बकाले यांची चौकशी देखील करण्यात येणार आहे.
दरम्यान, अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटना जामनेर तालुक्यावतीने उर्मट अधिकारी वकाले यांनी मराठा समाजाबद्दल व महिलांबद्दल एकदम खालच्या स्तरावरचे शब्द वापरल्याने, त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासह, त्यांच्या मालमत्तेची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, गुन्हा दाखल करावा. अन्यथा छावा संघटनेतर्फे मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले.
निवेदन देताना जिल्हाप्रमुख राजूभाऊ कुमावत, वाकोद जामनेर तालुका प्रमुख विलास पाटील, शेंदुर्णी जामनेर शहर प्रमुख पवणभाऊ, रिटायर फौजी व छावा सल्लागार काशिनाथ दादाशिंदे, जामनेर पहुर शहर प्रमुख प्रदीप घोलप, शेंदुणीँ शहर प्रमुख विकास न्हावी, वाकोद शहर प्रमुख विनोद निकम आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







