मुरबाड (प्रतिनिधी) : सर्वपित्री अमावास्येच्या रात्री भूत आणि करणीची बाधा झालेल्या तरुणीवर तंत्रमंत्र विदयेच्या द्वारे भयानक अघोरी कृत्य करणाऱ्या भोंदू मांत्रिकाचा डाव गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने उधळून लावला आहे. ही घटना मुरबाड तालुक्यातील सोनगावातील एका घरात घडली आहे.
याप्रकरणी टोकावडे पोलीस ठाण्यात कलम ३४, सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणाप्रतिबंध, समुळ उच्चाटन, अधिनियम २०१३ चे कलम ३(२),३(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येऊन दोन भोंदू मांत्रिकासह त्याचे पाच साथीदार आणि दोन तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरबाड तालुक्यातील सोनगावातील रशीद फकीर शेख यांच्या बंद घरात सर्वपित्री अमावास्येच्या रात्री नऊ ते साडे नऊ वाजल्याच्या सुमारास भूत आणि करणीची बाधा झालेल्यावर तंत्रमंत्र विदयेच्या द्वारे भयानक अघोरी कृत्य सुरू असल्याची माहिती शेजारीने गावातील पोलीस पाटलांना दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडताच, घरामधील अघोरी दृश्य पाहून गावकऱ्यांना धक्काच बसला होता. घरातील एका खोलीत दोन तरुणी व भोंदू मांत्रिक आणि त्याचे साथीदार अघोरी पूजेचे साहित्य लिंबू, मिरची, गुलाल अभीर अगरबत्ती, नारळ इत्यादी असे साहित्य ठेवून त्या तरुणीवर अघोरी कृत्य करताना घरात दिसून आल्याने गावकऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने भोंदू मांत्रिक त्याचे साथीदार आणि तरुणींना पंचनामा करून घरातील अघोरी पूजेचे साहित्य जप्त केले.
संजय लक्ष्मण भोईर, (वय ४० ) यांच्या तक्रारीवरून टोकावडे पोलीस ठाण्यात भोंदू मांत्रिकासह त्यांच्या साथीदार गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी काजी दाउद शेख, बंधू तुकाराम वाघ, विजय बंधू वाघ भोंदू मांत्रिकासह साईनाथ गोपाळ कदम, (वय ३६) गणेश पोपटराव देशमुख, (वय ३६) दत्तात्रेय बाळकृष्ण चौधरी (वय ३६) गणेश रामचंद्र शेलार, (वय ३२) यांनाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी केली असता, नाशिकवरून आणखी एक मांत्रिक अघोरी पूजेसाठी येणार असल्याची माहिती ताब्यात घेतलेल्या आरोपींनी पोलिसांना दिली आहे.







